टेकडा-पर्सेवाडा मार्गावरील पुलाचे बांधकाम रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:25 AM2021-07-02T04:25:14+5:302021-07-02T04:25:14+5:30
रेगुंठा परिसरात ये-जा करण्यासाठी दोन मार्ग आहेत. यामध्ये पहिला मार्ग टेकडा-पर्सेवाडा व दुसरा मार्ग बेज्जूरपल्ली आहे. या दोन्ही मार्गांची ...
रेगुंठा परिसरात ये-जा करण्यासाठी दोन मार्ग आहेत. यामध्ये पहिला मार्ग टेकडा-पर्सेवाडा व दुसरा मार्ग बेज्जूरपल्ली आहे. या दोन्ही मार्गांची अवस्था बिकट झाली आहे.
सिरोंचा तालुका मुख्यालयापासून ७० किमी अंतरावर असलेल्या या परिसरात घनदाट जंगल आहे, परंतु पक्के रस्ते अद्यापही निर्माण झाले नाही. स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतर टेकडा-पर्सेवाडा मार्गाच्या डांबरीकरणास मंजुरी मिळाली. २०१७-१८ मध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत २० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. मंजुरी मिळूनही कामाने मात्र वेग पकडला नाही. मागील तीन वर्षांपासून या मार्गावर पुलाचे बांधकाम करण्यात येत आहे. मात्र, कंत्राटदाराने बांधकाम अर्धवट ठेवले आहे. पूर्ण बांधकाम न झाल्याने, या मार्गावरील वाहतूक बंद आहे. रेगुंठा परिसरात रेगुंठा, कोटापल्ली, नरसिंहापल्ली, कोत्तूर, येला, मुलादिम्या, मोयाबीनपेठ, बोकाटगुद्दाम, दर्सेवाडा, पर्सेवाडा, चिट्याला आदी १९ गावांचा समावेश आहे. या परिसरातील नागरिकांना तालुका मुख्यालयात ये-जा करण्यासाठी बेज्जूरपल्ली मार्गावरून आवागमन करावे लागते. मात्र, बेज्जूरपल्ली मार्गाने तब्बल २५ किमी जास्तीचे अंतर प्रवास करावा लागताे. टेकडा-पर्सेवाडा मार्गावर बांधकाम पूर्ण झाल्यास रेगुंठा परिसरातील लोकांना हा मार्ग सोयीचा होणार आहे. या भागातील लोकप्रतिनिधी, तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून पुलाचे बांधकाम पूर्ण करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.