निधीअभावी बांधकाम रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 01:41 AM2019-01-10T01:41:57+5:302019-01-10T01:42:47+5:30
तालुका मुख्यालयापासून दोन किमी अंतरावर असलेल्या सातपुती गटग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गुटेकसा येथील सिमेंट काँक्रिट रस्ता बांधकाम निधीअभावी रखडले आहे. ३०० मीटर पैकी केवळ ६० मीटरचे काम दोन वर्षात पूर्ण झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरची : तालुका मुख्यालयापासून दोन किमी अंतरावर असलेल्या सातपुती गटग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गुटेकसा येथील सिमेंट काँक्रिट रस्ता बांधकाम निधीअभावी रखडले आहे. ३०० मीटर पैकी केवळ ६० मीटरचे काम दोन वर्षात पूर्ण झाले आहे. यावर जवळपास अर्धा निधी खर्च झाल्याने रस्त्याचे बांधकाम पूर्ण होणार की नाही, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
गुटेकसा येथील अंगणवाडीजवळून मुख्य रस्त्यावरील हनुमान मंदिरापर्यंत जाणाºया रस्त्यावर जवळपास ३०० मीटरपर्यंत सिमेंट काँक्रिटीकरण डीपीसीअंतर्गत मंजूर झाले. याकरिता २५ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला. परंतु आतापर्यंत संबंधित कंत्राटदाराला १२ लाख ३ हजार रूपये देण्यात आले, असे बांधकाम विभागाचे अभियंता बंदेलवार यांनी सांगितले. ३०० मीटरपैकी ६० मीटरपर्यंत सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले. उर्वरित रस्त्याचे काम शिल्लक आहे. त्यामुळे दिलेल्या इष्टीमेटमध्ये रस्त्याचे काम पूर्ण होणार की नाही, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. मागील दोन वर्षांपासून या रस्त्याच्या कामात कुठल्याही प्रकारच्या हालचाली दिसून येत नाही. त्यामुळे प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप नागरिकांनी केला आहे. आतापर्यंत पूर्ण झालेल्या ६० मीटरच्या रस्त्यासोबत उरलेल्या २४० मीटरपर्यंत मुरूम आणि गिट्टी टाकण्यात आली आहे. तसेच ड्रेनेजचे काम करण्यात आले आहे. शासकीय नियमानुसार प्रत्येक कामाचा कालावधी ठरलेला असतो. परंतु मागील दोन वर्षांपासून सदर रस्त्याचे काम रखडले आहे. प्रशासनाने सदर रस्त्याचे काम मार्गी लावण्याबाबत उदासीन आहेत. विशेष म्हणजे सदर रस्त्याचे काम मार्गी लावण्याबाबत अनेकदा पाठपुरावा करण्यात आला. परंतु दुर्लक्ष झाले. रस्त्यावर टाकलेल्या गिट्टीमुळे आवागमनासही नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. दुर्लक्षामुळे यापुढील काम करण्यास दिरंगाई होत आहे. त्यामुळे सदर कामासंदर्भात चौकशी करून रखडलेल्या रस्त्याचे काम तातडीने मार्गी लावावे, अशी मागणी नागरिकांनी जिल्हाधिकाºयांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. निवेदन देताना माजी पं.स.सदस्य हेमंता शेंडे, आसाराम शेंडे, भूमेश शेंडे, रंजना शेंडे, राकेश शेंडे, राहुल मांडवे उपस्थित होते.