गोदामांचे बांधकाम रखडले
By admin | Published: June 14, 2014 11:35 PM2014-06-14T23:35:06+5:302014-06-14T23:35:06+5:30
आदिवासी विकास महामंडळाच्यावतीने खरेदी केलेले धान्य सुरक्षित ठेवण्यासाठी जिल्ह्यात १० गोदामांच्या निर्मितीसाठी शासनाने मंजुरी दिली होती. परंतु सदर गोदामाच्या बांधकामासाठी अजुनपर्यंत प्रशासनाकडे
आदिवासी विकास महामंडळ : १० गोदामांसाठी निधी उपलब्ध नाही
गडचिरोली : आदिवासी विकास महामंडळाच्यावतीने खरेदी केलेले धान्य सुरक्षित ठेवण्यासाठी जिल्ह्यात १० गोदामांच्या निर्मितीसाठी शासनाने मंजुरी दिली होती. परंतु सदर गोदामाच्या बांधकामासाठी अजुनपर्यंत प्रशासनाकडे निधी उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. त्यामुळे सद्यस्थितीत एकाही गोदामांचे बांधकाम करण्यास सुरूवात करण्यात आली नाही.
आदिवासी विकास महामंडळ नाशिक अंतर्गत जिल्ह्यात उपप्रादेशिक कार्यालय कार्यान्वित करण्यात आले आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून दुर्गम व अतिदुर्गम भागात विविध कार्यकारी सहकारी संस्था स्थापन करण्यात आल्या आहेत. या संस्थांच्या माध्यमातून आदिवासी विकास महामंडळ शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले धान्य खरेदी करण्यात येत आहे. परंतु जिल्ह्यात अनेक प्रकारच्या खरेदी केलेल्या धान्याची साठवणूक करण्याकरिता गोदामांची व्यवस्था नसल्याने अनेक दिवसांपासून जिल्ह्यात नवीन गोदामांची निर्मिती करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती. या मागणीनुसार अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षक विभागाने जिल्ह्यात दहा गोदामांची निर्मिती करण्याची मंजुरी दिली. यासाठी ३९ कोटी ८६ लाख २२ हजार २८० रूपयाचा निधी प्रस्तावित करण्यात आला. परंतु प्रशासनाला मंजूर केलेला निधी अजुनपर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. त्यामुळे आदिवासी विकास महामंडळाअंतर्गत खरेदी केलेले धान्य उघड्यावर ठेवावे लागत आहे.
एटापल्ली, कुरखेडा, कोरची तालुक्यातील अनेक धान्य खरेदी केंद्र खरेदी केलेले धान्य उघड्यावरच ठेवत आहेत. त्यामुळे कोट्यावधी रूपयांच्या धानाची नासाडी होत आहे. (शहर प्रतिनिधी)