रेती अभावी घरकुलांचे बांधकाम ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:08 AM2021-03-04T05:08:45+5:302021-03-04T05:08:45+5:30
प्रधानमंत्री आवास, रमाई आवास, शबरी आवास आवास योजने अंतर्गत सन २०१६-१७ पासून एकूण १ हजार ८११ मंजूर घरकुलांपैकी १ ...
प्रधानमंत्री आवास, रमाई आवास, शबरी आवास आवास योजने अंतर्गत सन २०१६-१७ पासून एकूण १ हजार ८११ मंजूर घरकुलांपैकी १ हजार १०१ घरकूल बांधकाम पूर्ण झालेली आहेत. तर २३४ अपूर्ण कामे आहेत. सन २०२०-२१ मध्ये ६६७ घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले. त्यापैकी ३७३ घरकूल मंजूर करण्यात आले. त्यापैकी १५३ कामे सुरू आहेत. काही घरकूल मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.
घर बांधकामासाठी रेती हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. मात्र रेती घाटांचे लिलाव झाले नाहीत. सदर बांधकामाकरिता रेती घाटावरुन पुरवठा करता येईल यास्तव उपाययोजना करण्याची विनंतीवजा निवेदन पंचायत समिती पदाधिकाऱ्यांनी देसाईगंज तहसीलदार यांना ४ जानेवारी रोजी दिले होते.
मात्र या मागणीला तब्बल दोन महिन्यांचा कालावधी लोटून अद्यापही कुठलाच ठोस निर्णय घेण्यात आला नाही. रेती उपलब्ध होऊ शकत नसल्याने बांधकाम करायचे कसे? याच विवंचनेत घरकूल लाभार्थी सापडले आहेत. रेती लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्याची मागणी देसाईगंज पंचायत समितीच्या सभापती रेवता अणोले, उपसभापती शेवंता अवसरे, सदस्य तथा माजी सभापती मोहन गायकवाड, माजी उपसभापती गोपाल उईके,सदस्य अशोक नंदेश्वर तसेच अर्चना ढोरे यांनी केली आहे.