सीआरपीएफच्या वतीने तलावाची निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 12:00 AM2019-07-08T00:00:12+5:302019-07-08T00:01:38+5:30
सीआरपीएफ ३७ बटालीयनच्या वतीने पाणी टंचाईच्या प्रश्नावर मात करण्यासाठी येथील प्राणहिता मुख्यालयाच्या परिसरात तलावाची निर्मिती करण्यात आली आहे. आता पहिल्याच पावसाने या तलावात पाणी साचले असून प्राणहिता मुख्यालयाच्या परिसरात लावण्यात आलेल्या १ हजार रोपट्यांना उन्हाळ्यात या तलावाच्या माध्यमातून पाणी पुरवठ्याची सुविधा करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : सीआरपीएफ ३७ बटालीयनच्या वतीने पाणी टंचाईच्या प्रश्नावर मात करण्यासाठी येथील प्राणहिता मुख्यालयाच्या परिसरात तलावाची निर्मिती करण्यात आली आहे. आता पहिल्याच पावसाने या तलावात पाणी साचले असून प्राणहिता मुख्यालयाच्या परिसरात लावण्यात आलेल्या १ हजार रोपट्यांना उन्हाळ्यात या तलावाच्या माध्यमातून पाणी पुरवठ्याची सुविधा करण्यात येणार आहे.
अहेरी स्थित प्राणहिता पोलीस मुख्यालयामध्ये कार्यरत असलेल्या ३७ बटालीयनचे कमांडंट श्रीराम मीना यांच्या मार्गदर्शनात जलसिंचनाच्या योजनेंतर्गत तलावाची निर्मिती करण्यात आली. कॅम्पच्या परिसरात नाला वाहतो. या नाल्यातील पाणी नवनिर्मित तलावामध्ये साठविण्यात येणार आहे. त्यानंतर सदर पाणी लावलेल्या रोपट्यांना देण्यात येणार आहे. यामुळे जमिनीतील जलपातळी वाढणार असून या भागात दुष्काळी परिस्थिती जाणविणार नाही.
अहेरी, भामरागड, धोडराज, लाहेरी, कोठी, नारगुंडा आदी ठिकाणी १ हजार रोपे कॅम्पच्या परिसरात लावण्यात आले आहे. तलावाच्या निर्मितीदरम्यान सीआरपीएफच्या ३७ बटालीयनचे कमांडंट श्रीराम मीना, द्वितीय कमान अधिकारी अमित सागवान, उपकमांडंट संजयकुमार पुनिया, उपकमांडंट राजेंद्र सिंह, वैैद्यकीय अधिकारी एम. संपतकुमार यांच्यासह ३७ बटालीयनचे सर्व अधिकारी व जवान उपस्थित होते.
गतवर्षीसुद्धा कमांडंट श्रीराम यांच्या पुढाकाराने कॅम्पच्या परिसरात एक छोटासा तलाव तयार करण्यात आला होता. या तलावामुळे परिसरातील पाणी पातळी वाढली. परिणामी हातपंप व विहिरींनी तळ गाठला नाही. सीआरपीएफच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.