चर्चेनंतरच मेडिगड्डाचे बांधकाम
By admin | Published: May 7, 2016 12:22 AM2016-05-07T00:22:40+5:302016-05-07T00:22:40+5:30
पुढील पाच महिने मुहूर्त नसल्याने घाईने तेलंगणा सरकारने मेडिगड्डा-कालेश्वर धरणाचे भूमिपूजन केले असले ...
फडणवीसांसोबत केसीआर करणार चर्चा : पाच महिने मुहूर्त नसल्याने घाईने केले भूमिपूजन
सिरोंचा : पुढील पाच महिने मुहूर्त नसल्याने घाईने तेलंगणा सरकारने मेडिगड्डा-कालेश्वर धरणाचे भूमिपूजन केले असले तरी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतरच प्रत्यक्ष बांधकामाला सुरूवात केली जाणार आहे. अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.
१ मे रोजी शुक्र अस्तंगत असल्याने वास्तू व भूमिपूजनाकरिता अनुकूल योग नव्हता. २ मे चा मुहूर्त टळला असता तर पुढे नोव्हेंबरपर्यंत मुहूर्त नाहीत. त्यामुळे तेलंगणा सरकारने प्रकल्पाचे भूमिपूजन केले. मात्र हा सोहळा प्रकल्पाचा कोनशिलान्यास नाही. आंध्र व तेलंगणच्या सर्वेक्षण अहवालाचा अभ्यास करूनच निर्णय घेण्यात येईल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत होणाऱ्या सकारात्मक चर्चेनंतरच प्रकल्पाला मूर्तरूप देण्यात येणार आहे, अशी माहिती तेलंगणच्या सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे अफवांचे पीक पसरविणाऱ्यांवर विश्वास ठेवू नये, असे तेलंगण सरकारच्या सूत्रांचे म्हणणे आहे. (तालुका प्रतिनिधी)
मेडिगट्टा नव्हे मेडिगड्डा
मेडिगड्डा गाव पूर्वी गोदावरीच्या अगदी काठावर वसले होते. गावशिवारात उंबराची अनेक झाडे होती. तेलगू भाषेत उंबराला मेडी म्हणतात. तर गड्डा म्हणजे, शिवार, माळरान, परिसर, प्रांत किंवा टापू होय. त्यामुळे मेडीच्या सान्निध्यातील गड्डा या अर्थी ते मेडिगड्डा या नावाने रूढ झाले. कालांतराने महापुरामुळे नागरिक विस्थापित झाल्यावर नदीपासून तीन किमी अंतरावर त्याचे पुनर्वसन करण्यात आले. या पुनर्वसित गावांचे अंबटपल्ली असे नामकरण झाले. मात्र हे गाव मेडिगड्डा म्हणूनच परिचीत आहे.