गरज नसलेल्या ठिकाणी झाले बांधकाम
By admin | Published: June 18, 2014 12:13 AM2014-06-18T00:13:02+5:302014-06-18T00:13:02+5:30
राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या व विकासाच्या दृष्टीने माघारलेल्या भामरागड तालुक्यात सरकारचा निधी मुरविण्याचे काम विकासाच्या नावावर सुरू आहे. भामरागडनजिकच्या हेमलकसा गावात ५०० मीटरच्या
सरकारी निधीचा अपव्यय : ५०० मीटरच्या अंतरात बांधले १३ कलवट
गडचिरोली : राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या व विकासाच्या दृष्टीने माघारलेल्या भामरागड तालुक्यात सरकारचा निधी मुरविण्याचे काम विकासाच्या नावावर सुरू आहे. भामरागडनजिकच्या हेमलकसा गावात ५०० मीटरच्या रस्त्यात १३ कलवटाचे बांधकाम करण्यात आले. एवढ्या बांधकामाची गरज नसतानाही हे काम करण्यात आला आहे. यामध्ये केवळ पैसे खाणे यासाठीच हे काम झाले. हे अगदी सूर्यप्रकाशाइतकेच स्पष्ट आहे. या कामाची जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी विशेष बाब म्हणून चौकशी करणे गरजेचे आहे, अशी मागणी हेमलकसाच्या ग्रामस्थांनी केली आहे.
भामरागड या दुर्गम तालुक्यात भामरागड-आलापल्ली मार्गावर हेमलकसा गावापासून ५०० मीटर अंतराच्या रस्त्यात १३ कलवट (मोरी) बांधकाम मंजूर करण्यात आले होते. जुने चार कलवट (मोरी) असताना आता नव्या ९ मोरींचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. सदर ठिकाणी एकही नाला नाही. पावसाळ्यात पाणी वाहते अशीही परिस्थिती नाही. मग कलवट बांधायचे कशाला? असा प्रश्न या भागातील नागरिकांनी बांधकाम प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच उपस्थित केला होता. याबाबत लोकमतने ७ मार्च २०१४ ला नागरिकांच्या माहितीनुसार वृत्तही प्रकाशित केले होते.
भामरागड ग्रामपंचायत अंतर्गत हेमलकसा गावाच्या मुख्य मार्गावरून पोच रस्त्यावर ५०० मीटर अंतरात चार कलवट असताना पुन्हा ९ कलवट बांधण्याचे नियोजन करण्यात आले व गावच्या ग्रामपंचायतीने विरोध केलेला असताना हे बांधकाम रेटून पूर्ण करण्यात आले. हे कलवटाचे बांधकाम पूर्णत्वास नेण्यात आले आहे. रस्त्यापेक्षा कलवट उंच झाले आहे. त्याच्यावरून वाहन जाणे अडचणीचे होत आहे. सायकलही जाऊ शकत नाही. गरज नसलेल्या ठिकाणी १३ कलवटे बांधून ठेवण्यात आल्यामुळे या कामात सरकारचा लाखो रूपयाचा निधी खर्च झाला आहे. या निधीतून संपूर्ण हेमलकसा गावात सिमेंट रस्ते करता आले असते. परंतु कलवटाचे बांधकाम करण्यात आले. गरज नसतानाही झालेल्या कामाचे बील काढण्यासाठी आता कंत्राटदाराची धावपळ सुरू आहे. या कामाची जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: लक्ष घालून चौकशी करण्याची गरज आहे. कामाची मागणी नसताना हे कलवटाचे १३ कामे का करण्यात आले, असा ग्रामस्थांचा सवाल आहे. या संदर्भात २४ फेब्रुवारीला भामरागड ग्रामपंचायतीने बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना आलापल्ली येथे पत्र देऊन कलवटाचे काम बंद करा, असे सांगितले. परंतु बांधकाम विभागाने ग्रामपंचायतीच्या पत्राची दखलही घेतलेली नाही, हे विशेष.