केवळ १७९ घरांची उभारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2020 06:00 AM2020-03-02T06:00:00+5:302020-03-02T06:00:29+5:30
२०१९-२० या आर्थिक वर्षात शासनाने ५ हजार १६८ घरे मंजूर केली होती. घर बांधकामाचा शुभारंभ करण्यासाठी संबंधित लाभार्थ्याला पहिला हप्ता दिला जातो. जिल्ह्यातील ४ हजार ८०९ लाभार्थ्यांना पहिला हप्ता देण्यात आला आहे. पहिल्या हप्त्याच्या रकमेतून एका विशिष्ट प्रमाणापर्यंत काम केल्यानंतर दुसरा हप्ता मंजूर केला जातो. १ हजार ३३६ लाभार्थ्यांना दुसरा हप्ता देण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात ५ हजार १६८ घरे मंजूर करण्यात आली. आर्थिक वर्ष संपण्याच्या मार्गावर असताना केवळ १७९ घरे पूर्ण झाली आहेत. यावरून घर बांधकामाची गती अतिशय संथ असल्याचे दिसून येत आहे.
देशातील प्रत्येक कुटुंबाला स्वत:चा पक्का निवारा उपलब्ध व्हावा, या उद्देशाने केंद्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत केंद्र शासनामार्फत घर बांधकामासाठी लाभार्थ्याला १ लाख ३० हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांची यादी बनविण्यात आली आहे. त्यानुसार पहिल्याला प्रथम प्राधान्य या धर्तीवर यादीतील लाभार्थ्यांना घरकूल उपलब्ध करून दिले जात आहे.
२०१९-२० या आर्थिक वर्षात शासनाने ५ हजार १६८ घरे मंजूर केली होती. घर बांधकामाचा शुभारंभ करण्यासाठी संबंधित लाभार्थ्याला पहिला हप्ता दिला जातो. जिल्ह्यातील ४ हजार ८०९ लाभार्थ्यांना पहिला हप्ता देण्यात आला आहे. पहिल्या हप्त्याच्या रकमेतून एका विशिष्ट प्रमाणापर्यंत काम केल्यानंतर दुसरा हप्ता मंजूर केला जातो. १ हजार ३३६ लाभार्थ्यांना दुसरा हप्ता देण्यात आला आहे. २९४ लाभार्थ्यांना तिसरा हप्ता तर ४२ लाभार्थ्यांना चवथा हप्ता देण्यात आला आहे. चवथा व तिसरा हप्ता प्राप्त करणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या कमी आहे. यावरून स्लॅब लेवलपर्यंत घराचे बांधकाम पोहोचलेल्यांची संख्या कमी असल्याचे दिसून येत आहे. अजुनही काही घरांचे काम केवळ जोत्यापर्यंतच पूर्ण झाले आहे. आर्थिक वर्ष संपण्याच्या पहिले बांधकाम होणे अपेक्षित आहे.
केंद्र शासनाकडून उद्दिष्ट प्राप्त झाल्यानंतर लाभार्थी निवडणे, घरांना मंजुरी देणे व बँक खात्यात पैसे जमा होणे, यासाठी बराच उशीर होते. तोपर्यंत पावसाळा सुरू होते. पावसाळ्यामध्ये घराचे काम करणे शक्य होत नाही. तसेच ग्रामीण भागातील नागरिक शेतीच्या कामात व्यस्त होतात. परिणामी घर बांधकामाकडे दुर्लक्ष होते. उन्हाळ्यातच कामाला गती येते. मात्र रेतीचा तुटवडा असल्याने घरांचे बांधकाम प्रभावित झाले असल्याचे दिसून येत आहे.
तीन वर्षात मिळाले १० हजार घरकूल
प्रधानमंत्री आवास योजनेची सुरूवात २०१६-१७ या वर्षात झाली. मागील तीन वर्षात १० हजार १६१ घरांना मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. अजुनही लाखो कुटुंब घरांच्या प्रतीक्षेत आहेत. विद्यमान केंद्र शासनाच्या धोरणानुसार २०२२ पर्यंत प्रत्येकाला पक्के घर द्यायचे आहे. शासनाने ठरविलेल्या उद्दिष्टापेक्षा कितीतरी कमी कुटुंबांना घरकूल मिळाले आहे. दोन वर्षात उर्वरित कुटुंबांना खरच घरकूल मिळणार काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.