जागा नसताना काढले बांधकामाचे टेंडर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 10:40 PM2017-09-04T22:40:09+5:302017-09-04T22:40:28+5:30
स्थानिक नगर परिषदेच्या नवीन प्रशस्त इमारतीचे बांधकाम करण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून निधी मंजूर करून ....
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : स्थानिक नगर परिषदेच्या नवीन प्रशस्त इमारतीचे बांधकाम करण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून निधी मंजूर करून वर्षभरापूर्वी निविदा प्रक्रियाही करण्यात आली. मात्र प्रत्यक्षात ज्या जागेवर ही इमारत उभी करायची आहे ती जागाच न.प.ला इमारत बांधकामासाठी अद्याप मंजूर झालेली नसल्याची बाब उघडकीस आली आहे. असे असताना निविदा काढण्याची घाई कशासाठी करण्यात आली? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नगर परिषदेने जुलै २०१६ मध्ये नगर परिषदेच्या इमारतीचे आणि कंपाऊंड वॉलसाठी मिळून ३ कोटी ३३ लाख रुपयांच्या बांधकामाची निविदा प्रक्रिया केली. ही निविदा प्रक्रिया पूर्ण करून कंत्राटही निश्चित करण्यात आला. परंतू वर्ष लोटले तरी हे बांधकाम मात्र सुरू करण्यात आले नाही. त्याबद्दल न.प.च्या बांधकाम विभागाकडे विचारणा केली असता नवीन डीपी मध्ये अजून बांधकामाच्या जागेला मंजुरी मिळायची असल्यामुळे बांधकाम सुरू करण्यात आले नसल्याचे सांगण्यात आले. जर असे होते तर ही प्रक्रिया आधीच करून नंतर निविदा प्रक्रिया का काढण्यात आली नाही, याचे उत्तर मात्र न.प.कडे नाही.
न.प.च्या मालकीची ती जागा दिवाणी न्यायालयासाठी आरक्षित आहे. पण न्यायालय दुसºया जागेत स्थानांतरित झाले असल्याने न.प.ला ती जागा इमारत बांधकामासाठी हवी आहे. डीपी मध्ये तसा बदल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तो बदल होताच बांधकाम काम सुरू होईल, असे न.प.चे अभियंता दाते यांनी सांगितले.
प्राप्त माहितीनुसार, काही पदाधिकारी आणि मुख्याधिकाºयांनी सदर निविदा प्रक्रिया करण्यासाठी पुढाकार घेतला. जागेचा मुद्दा लवकरच निकाली निघेल अशी आशाही त्यांना असेल, पण तसे झाले नाही. त्यामुळे त्यांना तोंडघशी पडावे लागले.