पिण्याच्या पाण्याचे ४०० स्रोत दूषित
By admin | Published: May 20, 2017 01:36 AM2017-05-20T01:36:35+5:302017-05-20T01:36:35+5:30
पाणी म्हणजे जीवन असे म्हटले जाते. पण हेच पाणी दूषित असेल तर ते जीवनदायी ठरण्याऐवजी मरणदायी ठरू शकते.
चार महिन्यांतील तपासणी : अहेरी, धानोरा, कोरची तालुक्यातील पाणी सर्वाधिक खराब
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : पाणी म्हणजे जीवन असे म्हटले जाते. पण हेच पाणी दूषित असेल तर ते जीवनदायी ठरण्याऐवजी मरणदायी ठरू शकते. अनेक जलजन्य आजारांच्या उद्रेकास कारणीभूत ठरणाऱ्या दूषित पाण्याचे प्रमाण जिल्ह्यात ५.१७ टक्के आहे. जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत जिल्हाभरातील विविध जलस्त्रोतांच्या नमुन्यांची तपासणी केली असता ७७४४ नमुन्यांपैकी ४०० पाणी नमुने दूषित आढळले आहेत.
सध्या तीव्र उन्हामुळे अनेक जलस्त्रोत आटले आहेत. पाण्याची गरज भागविण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांना मिळेल त्या पाण्यावर तहान भागवावी लागते. पण ते पाणी शुद्ध असतेच असे नाही. अशुद्ध पाण्यातून विविध आजार उद्भवू नये म्हणून त्यांचा शोध घेण्यासाठी दर महिन्याला आरोग्य विभागाकडून पाण्याचे नमुने घेतले जातात. त्यातील अहेरी, आरमोरी, चामोर्शी व कुरखेडा येथील ग्रामीण रुग्णालयात पाणी नमुन्याची तपासणी केली जाते. याशिवाय जिल्हास्तरावर जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा आणि भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणेच्या प्रयोगशाळेत पाण्याचे नमुने तपासले जातात.
प्रत्येक महिन्याला तपासल्या जाणाऱ्या नमुन्यांचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून संबंधित पंचायत समिती स्तरावर आणि संबंधित ग्रामपंचायतपर्यंत कळविला जातो. त्यानुसार कोणते पाण्याचे स्त्रोत दूषित आहेत याची माहिती ग्रामपंचायतला होऊन त्या ठिकाणी ब्लिचिंग पावडर किंवा मेडिक्लोअर टाकून क्लोरिनेशन केले जाते. त्यानंतर हे निर्जंतुकीकरण केलेले पाणी वापरण्यास योग्य होते. परंतू अनेक ग्रामपंचायतींमध्ये ब्लिचिंग पावडरच उपलब्ध नसल्यामुळे दूषित पाणी स्त्रोतांचे निर्जंतुकीकरण होतच नाही.
जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात जिल्हाभरात १२ तालुक्यांमध्ये ७७४४ पाणी नमुन्यांची तपासणी केली असता ४०० पाण्याचे स्त्रोत दूषित आढळले आहेत. एप्रिल महिन्यात दूषित पाण्याचे प्रमाण काही अंशी कमी झाले आहे.
साथरोगाचा धोका बळावला
सर्वाधिक दूषित जलस्त्रोत आढळलेल्या तालुक्यांमध्ये अहेरी (२१.०४ टक्के), कुरखेडा (९.६३ टक्के), धानोरा (९.१३ टक्के) आणि कोरची (७.१४ टक्के) या तालुक्यांचा समावेश आहे. यापैकी कोरची तालुक्याची स्थिती एप्रिल महिन्यात सुधारली असली तरी इतर तालुक्यांमध्ये फारसा पडलेला नाही. त्यामुळे त्या तालुक्यातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून साथरोगाचा आजार जडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाऊस पडताच साथरोग पसरण्याची शक्यता आहे.
वडसा, मुलचेरा, सिरोंचा, एटापल्ली,
भामरागडमध्ये सर्वाधिक शुद्ध पाणी
जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये जानेवारीपासून केलेल्या पाणी नमुन्यांच्या तपासणीत एकही नमुना दूषित आढळलेला नाही. त्या तालुक्यांमधील पाण्याचे सर्व स्त्रोत शुद्ध असल्याचे यावरून दिसून येते. त्यात वडसा, मुलचेरा, सिरोंचा, एटापल्ली व भामरागड या पाच तालुक्यांचा समावेस आहे.