वसतिगृहातील सांडपाण्याने लांझेडातील विहिरी दूषित
By admin | Published: September 10, 2016 01:14 AM2016-09-10T01:14:41+5:302016-09-10T01:14:41+5:30
आदिवासी विकास विभागाच्या मार्फतीने चालविल्या जाणाऱ्या शहरातील लांझेडा वार्डातील मुलींच्या वसतिगृहातील सांडपाणी, शौचालयाचे पाणी नजीकच्या तलावात सोडले जात आहे.
नागरिक त्रस्त : आदिवासी विकास विभागाचे होत आहे दुर्लक्ष
गडचिरोली : आदिवासी विकास विभागाच्या मार्फतीने चालविल्या जाणाऱ्या शहरातील लांझेडा वार्डातील मुलींच्या वसतिगृहातील सांडपाणी, शौचालयाचे पाणी नजीकच्या तलावात सोडले जात आहे. या तलावाचे पाणी दूषित होण्याबरोबरच वसतिगृहाच्या परिसरातील विहिरींचेही पाणी दूषित झाले असून दुर्गंधीयुक्त वास येत आहे. या संपूर्ण गंभीर प्रकाराकडे आदिवासी विकास विभागाच्या प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष आहे.
मुलीच्या वसतिगृहात जवळपास २०० ते ३०० विद्यार्थिनी आहेत. सदर वसतिगृहाला लागून शहराची एकही नाली नाही. त्यामुळे सदर सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी मोठा शोषखड्डा तयार करणे आवश्यक होते. कंत्राटदाराने मात्र लहानसा शोषखड्डा तयार करून शोषखड्डाचे बिल उचलले व वसतिगृहाचे सांडपाणी नजीकच्या तलावात सोडण्याची व्यवस्था केली. दरदिवशी हजारो लिटर सांडपाणी जवळपासच्या तलावात सोडले जात असल्याने या तलावाच्या पाण्यालाच दुर्गंधीयुक्त वास येत आहे. त्यामुळे सदर पाणी जनावरे सुध्दा पीत नाही. या सांडपाण्यामुळे तलावाच्या खालची शेती सुध्दा धोक्यात आली आहे. धानपीकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होत चालला आहे.
याच तलावाचे पाणी लांझेडा वार्डातील विहिरींना उतरते. त्यामुळे विहिरींच्या पाण्यालाही दुर्गंधीयुक्त वास येण्यास सुरूवात झाली आहे. पाण्यावर फेस जमा होत चालला आहे. बोअरवेलमधूनही असाच दुर्गंधीयुक्त पाणी येत चालला आहे. परिणामी मागील दोन महिन्यांपासून या वार्डातील नागरिकांना बोअरवेल व विहिरींचे पाणी वापरणे सुध्दा अशक्य झाले आहे. या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. (नगर प्रतिनिधी)