कोटापल्लीत ३ वर्षांपासून दूषित पाण्याचा पुरवठा; पाण्यात आढळून येतात जंतू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 03:41 PM2024-10-21T15:41:48+5:302024-10-21T15:42:28+5:30
आरोग्याची समस्या : नागरिकांमध्ये रोष
लोकमत न्यूज नेटवर्क
रेगुंठा : सिरोंचा तालुक्यातील कोटापल्ली येथील वॉर्ड क्रमांक ३ मध्ये गत तीन वर्षांपासून दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. परिणामी, येथील नागरिकांमध्ये विविध आजार बळावत आहेत. अशाही स्थितीत उपाययोजना केली जात नसल्याने नागरिकांमध्ये रोष आहे. दोन दिवसांपूर्वी येथील पाण्यात जंतूही आढळून आले होते.
कोटापल्ली येथील नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. येथील वॉर्ड क्रमांक ३ मध्ये नागरिकांना पिण्यासाठी शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जात नसल्याने नागरिकांचे आरोग्य बिघडत आहे. वॉर्डातील बऱ्याच जणांना उलटी, जुलाब, यासारख्या आजारांचा सामना करावा लागत आहे.
याशिवाय गावातील रस्ते खूपच खराब आहेत. सिमेंट काँक्रीटचे पक्के रस्ते तसेच दुतर्फा पक्क्या नाल्या नाहीत. नालीमध्ये पाणी साचून राहत असल्याने येथे डासांची मोठ्या प्रमाणात पैदास होत आहे. वॉर्ड क्रमांक ३ मध्ये असलेला हातपंप खालून खचलेला असून बोअरवेल खराब झालेले आहे. उन्हाळ्यात तर या हातपंपामध्ये पाणी राहत नाही. कधी कधी दुसऱ्या गावाला जाऊन बैलगाडीने पाणी आणावे लागते. सध्या निर्माण झालेली समस्या लवकर सोडवावी, अशी मागणी नागरिकांनी केली. यासंदर्भात जि.प.चे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्यापुढेही नागरिकांनी समस्या मांडली.
ग्रा.पं. प्रशासनाचे दुर्लक्ष
कोटापल्ली येथील वॉर्ड क्रमांक ३ मध्ये पिण्याच्या दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे, तसेच येथील रस्त्यांची दुरवस्था झाली असल्याने नागरिकांना असुविधांचा सामना करावा लागत आहे. याबाबत नागरिकांनी ग्रामसेवक, आणि सरपंच यांच्याकडे तक्रार केल्यानंतरही कार्यवाही झालेली नाही, असा आरोप गावातील नागरिकांचा आहे.