मोहली गावात दूषित पाणीपुरवठा
By admin | Published: March 25, 2017 02:22 AM2017-03-25T02:22:53+5:302017-03-25T02:22:53+5:30
धानोरा तालुक्यातील मोहली येथील ग्रामपंचायत प्रशासनाने गावातील नळ पाणीपुरवठ्याच्या टाकीची गेल्या अनेक दिवसांपासून
आरोग्य धोक्यात : टाकीच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष
रांगी /धानोरा: धानोरा तालुक्यातील मोहली येथील ग्रामपंचायत प्रशासनाने गावातील नळ पाणीपुरवठ्याच्या टाकीची गेल्या अनेक दिवसांपासून स्वच्छता न केल्यामुळे या टाकीमधून गावात नळाद्वारे दूषित पाणीपुरवठा होत आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.
गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यासाठी ग्राम पंचायत प्रशासनाने लाखो रूपये खर्च करून नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली. सुरुवातीचे काही वर्ष गावात सुरळीत व शुद्ध पाण्याचा पुरवठा झाला. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाचे टाकीच्या स्वच्छतेकडे प्रचंड दुर्लक्ष झाले. गेल्या अनेक दिवसांपासून ग्राम पंचायत प्रशासनाने पाण्याच्या टाकीची एकदाही स्वच्छता केली नाही. त्यामुळे या टाकीतून गावात दूषित व गढूळ स्वरूपाचा पाणीपुरवठा होत आहे. गावातील नागरिक याच पाण्यावर आपली तहान भागवत आहेत.
उन्हाळ्याच्या दिवसात गढूळ पाण्यामुळे विविध रोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाण्याच्या टाकीतून नळाद्वारे पाण्यासोबत गाळ येतो, अशा प्रकारची तक्रार ग्रामपंचायत प्रशासनाकडे नागरिकांनी केली. मात्र ग्राम पंचायत प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही. त्यानंतर पुन्हा अनेक नागरिकांनी ग्राम पंचायत पदाधिकारी व सदस्यांना भेटून यासंदर्भात समस्या मांडली. मात्र त्यानंतरही कार्यवाही झाली नाही. ग्राम पंचायतीने तत्काळ पाणीटाकीची स्वच्छता करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)