अंधश्रद्धा निर्मूलनात सातत्य ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 10:31 PM2019-04-18T22:31:17+5:302019-04-18T22:31:53+5:30
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने शासनाकडून कोणत्याही प्रकारचे अनुदान न घेता समाजप्रबोधनाचे कार्य सातत्याने सुरू आहेत. गडचिरोलीसारख्या आदिवासी बहुल भागात अंधश्रद्धेचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम सातत्याने सुरू ठेवणे आवश्यक आहे,......
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने शासनाकडून कोणत्याही प्रकारचे अनुदान न घेता समाजप्रबोधनाचे कार्य सातत्याने सुरू आहेत. गडचिरोलीसारख्या आदिवासी बहुल भागात अंधश्रद्धेचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम सातत्याने सुरू ठेवणे आवश्यक आहे, असे आवाहन दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार यांनी केले.
महाराष्ट्र अंनिस जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने बुधवारी स्थानिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात जिल्हा प्रेरणा मेळावा घेण्यात आला. यावेळी उद्घाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंनिसचे ज्येष्ठ सल्लागार मार्गदर्शक डॉ.शिवनाथ कुंभारे होते. प्रमुख अतिथी म्हणून अंनिसचे राज्य प्रधान सचिव माधव बावगे, राज्य सरचिटणीस संजय शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी डॉ.शिवनाथ कुंभारे म्हणाले, अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम समितीमार्फत सुरूच आहे. या कामाला अधिक बळकटी देण्यासाठी गाव तिथे अंनिसची शाखा कशी निर्माण करता येईल, यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे सांगितले. संजय शेंडे व माधव बावगे यांनी विविध जिल्ह्यातील अंनिसच्या शाखांमधून संघटनेचे कार्य कशाप्रकारे चालले आहे, याबाबतची माहिती दिली.
मेळाव्याचे संचालन विलास निंबोरकर यांनी केले तर आभार विलास पारखी यांनी मानले. यशस्वीतेसाठी गडचिरोली शहर शाखेच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.
अंनिसची नवी जिल्हा कार्यकारिणी गठित
अंनिसच्या जिल्हा प्रेरणा मेळाव्यादरम्यान अंनिसची जिल्हा कार्यकारिणी गठित करण्यात आली. नव्या कार्यकारिणीमध्ये अंनिसचे जिल्हाध्यक्ष म्हणून उद्धव डांगे, उपाध्यक्षपदी शबीर शेख, पी.जे.सातार, भ्रिष्मा मून तर कार्याध्यक्ष म्हणून विलास निंबोरकर, प्रधान सचिवपदी पुरूषोत्तम ठाकरे, निधी व्यवस्थापन प्रमुख म्हणून विठ्ठलराव कोठारे, बुवाबाजी संघर्ष प्रमुख म्हणून गजानन राऊत, विविध उपक्रम प्रमुख म्हणून विवेक मून, वैज्ञानिक जाणीवा प्रकल्प प्रमुख म्हणून प्रशांत नैताम आदींची निवड करण्यात आली. याशिवाय गडचिरोली, आलापल्ली, एटापल्ली, चामोर्शी व इतर शाखांच्या प्रमुखांची नावे जाहीर करण्यात आली.