पीएफ निधीची बीडीएस प्रणाली कायम सुरू ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:37 AM2021-08-15T04:37:35+5:302021-08-15T04:37:35+5:30
गडचिराेली : मागील पाच-सहा महिन्यांपासून जीपीएफ बीडीएस प्रणाली सतत बंद राहत असल्यामुळे जिल्ह्यातील अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आर्थिक ...
गडचिराेली : मागील पाच-सहा महिन्यांपासून जीपीएफ बीडीएस प्रणाली सतत बंद राहत असल्यामुळे जिल्ह्यातील अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कर्मचाऱ्यांच्या भविष्यनिर्वाह निधीतील हक्काचा पैसा त्यांना तत्काळ मिळण्यासाठी भविष्यनिर्वाह निधी बीडीएस प्रणाली कायम सुरू ठेवावी, अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने केली आहे.
या संदर्भात माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत राज्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, मागील पाच ते सहा महिन्यांत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या भविष्यनिर्वाह निधीच्या खात्यात जमा असलेली रक्कम अजूनही मिळालेेली नाही. शिक्षणाधिकारी आर. पी. निकम यांना निवेदन देताना संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय खरवडे, जिल्हा कार्यवाह अजय लाेंढे, दिलीप गडपल्लीवार, नरेंद्र भाेयर, यादव बानबले, संजय दाैरेवार, सतीश धाईत, किशाेर पाचभाई, आदी उपस्थित हाेते.
(बॉक्स)
अग्रीमसाठीचे प्रस्ताव प्रलंबित
अनेकांनी आपल्या पाल्याच्या शिक्षणासाठी तसेच लग्न आणि परिवारातील सदस्यांच्या वैद्यकीय उपचारांसाठी भविष्यनिर्वाह निधीतील जमा रकमेतून अग्रीम उचलण्यासाठी वेतनपथकात प्रस्ताव दाखल केले आहेत; परंतु बीडीएस प्रणाली बंद असल्यामुळे प्रस्ताव प्रलंबित असून, कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे, असे म्हटले आहे.