नळ योजना नियमित सुरू ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 12:35 AM2019-01-06T00:35:15+5:302019-01-06T00:37:23+5:30
गावात शुद्ध पाणी पुरवठा करून नागरिकांचे आरोग्य चांगले राखण्याचा पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने संकल्प केलेला आहे. संपूर्ण देशात आपले राज्य प्रथम हागणदारीमुक्त झालेले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गावात शुद्ध पाणी पुरवठा करून नागरिकांचे आरोग्य चांगले राखण्याचा पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने संकल्प केलेला आहे. संपूर्ण देशात आपले राज्य प्रथम हागणदारीमुक्त झालेले आहे. आज नागपूर विभागात १११ ग्रामपंचायतीअंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेचा ई-शुभारंभ केलेला आहे. आता ग्रामपंचायतींनी पाणी पट्टीकर वसुल करून नळ योजना नियमित सुरू ठेवाव्या, असे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
नागपूर विभागातील पाणी पुरवठा योजनांच्या ई- भूमिपूजनाचा कार्यक्रम नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात शनिवारी आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर तसेच स्वच्छता विभागाचे सचिव प्रामुख्याने उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने येथील जिल्हाधिकारी कार्यालयात व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे संवाद साधत असताना जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष योगिता भांडेकर, आमदार डॉ. देवराव होळी, कार्यकारी अभियंता घोडमारे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुतीरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पुराम, उपविभागीय अधिकारी कटरे, वरिष्ठ भुवैज्ञानिक पुराम, शाखा अभियंता संजय खोकले, भुजंगराव पदा, माटे उपस्थित होते.
पुढे बोलताना ना. फडणवीस म्हणाले की, नागरिकांच्या आरोग्याशी निगडीत आलेली योजना म्हणजे नळ पाणी पुरवठा योजना मोठया प्रमाणात राबवून शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. याकरिता ८८ कोटी रुपये खर्चाला मान्यता प्रदान करण्यात आली. यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील आठ नळ पाणी पुरवठा योजनांचा समावेश आहे. तसेच ग्रामपंचायतीनी ही योजना नियमित सुरु राहण्यासाठी पाणी पट्टीकर वसुलीसाठी प्रयत्नरत असावे. यावर्षी आपण ३३ कोटी वृक्ष लागवड करुन एक मोठी हरीत क्रांती करीत आहोत यामध्ये सर्व ग्रामपंचायतीनी, सर्व कार्यालयांनी, नागरिकांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवून आपल्या स्मार्ट ग्रामपंचायत सोबतच हरीत ग्रामपंचायत करावी, असेही आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
शनिवारी मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपूर येथे गडचिरोली जिल्ह्यातील आठ नळ पाणी पुरवठा योजनांचा ई- भूमिपूजन करुन शुभारंभ केला. यामध्ये अहेरी तालुक्यातील महागांव बु. आरमोरी मधील वडधा, चामोर्शी मधील कुनघाडा व कळमगांव एकोडी, धानोरा तालुक्यातील मिचगांव व साखेरा, एटापल्ली तालुक्यातील चंदनवेली आणि सिरोंचा तालुक्यातील लक्ष्मीदेवीपेठा या गावांचा समावेश आहे. या आठ योजनांसाठी ५ कोटी ८९ लक्ष ८७ हजार रूपये खर्च होणार आहेत. यावेळी ८ ग्रा.पं.चे सरपंच हजर होते.