कंत्राटी कर्मचारी वेतनाच्या प्रतीक्षेत
By admin | Published: November 8, 2014 01:15 AM2014-11-08T01:15:06+5:302014-11-08T01:15:06+5:30
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत जिल्ह्यात ७०० पेक्षा अधिक कंत्राटी अधिकारी व कर्मचारी जिल्ह्याच्या आरोग्यसेवेत कार्यरत आहेत.
गडचिरोली : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत जिल्ह्यात ७०० पेक्षा अधिक कंत्राटी अधिकारी व कर्मचारी जिल्ह्याच्या आरोग्यसेवेत कार्यरत आहेत. मात्र शासनाकडून एनआरएचएमला अनुदान न मिळाल्यामुळे या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांपासून वेतन थकले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे जिल्ह्याच्या आरोग्यसेवेवर परिणाम होत आहे.
जिल्ह्यात जिल्हा मुख्यालयी एक सामान्य रूग्णालय, तालुकास्तरावर तीन उपजिल्हा रूग्णालय व अन्य तालुक्यात ग्रामीण रूग्णालयात आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र आहेत. या आरोग्य यंत्रणेमध्ये काही कर्मचारी कायमस्वरूपी आहेत. मात्र राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरू झाल्यापासून जिल्ह्यात कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यात एनआरएचएम अंतर्गत एकूण जवळपास ८१८ पदे मंजूर आहेत. यापैकी ७३७ पदे भरण्यात आली असून ८१ पदे रिक्त आहेत. यामध्ये जिल्हा मुख्यालयी असलेल्या एनआरएचएमच्या कार्यालयात जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, जिल्हा रोकड व्यवस्थापक, मूल्यमापन व सहनियंत्रण अधिकारी आदींसह जवळपास २३ कर्मचारी कार्यरत आहेत. जिल्हास्तरावरील कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यापासून वेतन प्रलंबित आहे. तर तालुकास्तरावरील ग्रामीण भागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे तीन महिन्याचे वेतन प्रलंबित आहे. शासनाने वेतनाचे अनुदान सहा ते सात दिवसापूर्वी जिल्हा कार्यालयाला पाठविल्याची माहिती आहे. त्यामुळे सदर अनुदान बँकेत जमा करून प्रलंबित वेतन अदा करण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती एनआरएचएमच्या सुत्रांकडून मिळाली आहे.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत स्टाप नर्सेसचे २७ पदे मंजूर आहेत. यापैकी ६ पदे भरण्यात आली आहे. एनआरएचएम अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी ३७७ पैकी ३७५ एएनएम कंत्राटी स्वरूपात कार्यरत आहेत. तसेच ३२ एलएचव्ही कार्यरत आहेत. कंत्राटी कर्मचाऱ्यांची संख्या मोठी असल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरवशावर जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा अवलंबून आहे. याशिवाय जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय, जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालय, जिल्हा हत्तीरोग अधिकारी कार्यालयांतर्गत एनआरएचएमचे कंत्राटी वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचारी जिल्ह्यात कार्यरत आहेत. मात्र दरवर्षी एनआरएचएमला शासनाचे वेतनाचे अनुदान उशीरा मिळत असल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाला विलंब होत असतो.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व शासकीय रूग्णालयांमध्ये महिला व पुरूषांचे मिळून ४० वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पदे मंजूर आहेत. यापैकी सध्या शासकीय रूग्णालयात १९ पुरूष वैद्यकीय अधिकारी व १८ महिला वैद्यकीय अधिकारी कंत्राटी स्वरूपात कार्यरत आहेत. याशिवाय २० पैकी १९ औषध निर्माता शासकीय रूग्णालयात कार्यरत आहेत. तसेच ७ आयुर्वेदिक वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. मात्र एनआरएचएमच्या या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेतन नियमित होत नसल्याने या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मनोबल खचत असल्याचे दिसून येते. (स्थानिक प्रतिनिधी)