कंत्राटी अग्निशमन कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 10:29 PM2019-07-11T22:29:08+5:302019-07-11T22:30:02+5:30
मागील सात-आठ महिन्यांपासून कंत्राटदाराने पगार न दिल्याने त्रस्त झालेल्या अग्निशमन विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी अखेर गुरूवारपासून (दि.११) कामबंद आंदोलन केले. नगर परिषदेला सर्व प्रकरण माहिती असतानाही कंत्राटदारावर काहीच कारवाई होत नसल्याने येथे सर्वांनी शंका व्यक्त केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागील सात-आठ महिन्यांपासून कंत्राटदाराने पगार न दिल्याने त्रस्त झालेल्या अग्निशमन विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी अखेर गुरूवारपासून (दि.११) कामबंद आंदोलन केले. नगर परिषदेला सर्व प्रकरण माहिती असतानाही कंत्राटदारावर काहीच कारवाई होत नसल्याने येथे सर्वांनी शंका व्यक्त केली आहे.
येथील अग्निशमन विभागात एका एजंसीमार्फत कंत्राटी तत्वावर कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांना कंत्राटदार मूळ पगार न देता त्यात कपात करीत असून त्यातही सात-आठ महिन्यांपासून पगार दिलेला नाही. कर्मचाऱ्यांनी पगार मागितल्यास त्यांना शिविगाळ व कामावरून काढण्याची धमकी देण्याचे प्रकार कंत्राटदार करीत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.
आपले काम हातून जाण्याच्या भितीने हे कर्मचारी आतापर्यंत शांत राहून सर्व सहन करीत होते. मात्र त्यांच्यावर उपाशी राहण्याची पाळी आल्याने कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी, नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार दिली. यानंतरही कंत्राटदारावर काहीच कारवाई करण्यात आली नाही. हक्काचा पैसा मिळत नसल्याने उपासमारीची पाळी आल्याने अखेर या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी गुरूवारपासून (दि.११) कामबंद आंदोलन सुरू केले.
आंदोलनात लोकचंद कावडे, अशोक कांबळे, जे.बी.गौर, महेंद्र बांते, रंजीत रहांगडाले, गजेंद्र पटले, मुकेश ठाकरे, हसन पठाण, सत्यम बिसेन, तैबाज सय्यद, आर.बी.बावनकर, सुमित बिसेन, सचिन बहेकार,अंश चौरसिया, बी.आर.शर्मा, आदित्य भाजीपाले, राहुल ढोमणे आदिंचा समावेश आहे.
दोन महिन्यांचा पगार मिळाला
कामबंद आंदोलनाबाबत कंत्राटी कर्मचाºयांनी जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांना निवेदन दिले असता त्यांनी नगर परिषद मुख्याधिकारी चंदन पाटील यांना फोनवर संपर्क साधला. यावर पाटील यांनी पगार करून देऊ असे सांगितले. दरम्यान, गुरूवारी कंत्राटी कर्मचाºयांनी कामबंद आंदोलन सुरू केले असता कंत्राटदाराने काहींना एक तर काहींना दोन महिन्यांचा पगार आणून दिल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, एवढ्यावरही संबंधीत एजंसीवर कुणीही काहीच कारवाई करीत नसल्याने नेमके पाणी कुठे मुरत आहे हे समजण्यापलीकडे आहे.
कामगार अधिकाºयांनी घेतली दखल
अग्निशमन विभागातील कंत्राटी कर्मचाºयांच्या या आंदोलनाबाबत व मागील कित्येक दिवसांपासून सुरू असलेल्या याप्रकरणाची दखल घेत सरकारी कामगार अधिकारी गुणवंत पंधरे व त्यांची सहकारी सचिव अरबट यांनी अग्निशमन कार्यालयात भेट दिली.याप्रसंगी त्यांनी सर्व कर्मचाºयांसोबत बोलून त्यांच्या समस्या लेखी स्वरूपात घेतल्या.तसेच कंत्राटदारास कर्मचाºयांचा पगार करण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली आहे. त्यानंतर आता या प्रकरणात कंत्राटदारावर काय कारवाई केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.