कंत्राटी कर्मचाऱ्यांचा आक्रोश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 12:50 AM2018-04-22T00:50:04+5:302018-04-22T00:50:04+5:30
समान काम, समान वेतन धोरणाचा अवलंब करण्यात यावा, एनआरएचएममधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना आरोग्य विभागात असलेल्या रिक्त जागांवर कायमस्वरूपी सामावून घेण्यात यावे, यासह विविध मागण्यांकरिता राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघ ....
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : समान काम, समान वेतन धोरणाचा अवलंब करण्यात यावा, एनआरएचएममधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना आरोग्य विभागात असलेल्या रिक्त जागांवर कायमस्वरूपी सामावून घेण्यात यावे, यासह विविध मागण्यांकरिता राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघ जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने ११ एप्रिलपासून कामबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. २१ एप्रिल रोजी शनिवारला जिल्हा परिषद समोर एनआरएचएमच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन केले. निदर्शनातून शासनाच्या धोरणाविरोधात शेकडो कंत्राटी कर्मचाऱ्यांनी एल्गार पुकारला.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात जवळपास ८५० कंत्राटी अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहे. यामध्ये वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका, आरोग्य सहाय्यीका, स्टाफ नर्स, लेखापाल, कार्यक्रम व्यवस्थापक आदी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. जिल्ह्यात २००७ पासून हे ८५० कंत्राटी अधिकारी व कर्मचारी आरोग्य सेवेत कार्यरत आहेत. मात्र दहा वर्ष उलटूनही या कर्मचाऱ्यांना कामानुसार वेतन देण्यात आले नाही. तसेच त्यांना सेवेत कायम करण्यात आले नाही. संघटनेच्या वतीने सातत्याने शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात आला. मात्र याची दखल शासनाने घेतली नाही. त्यामुळे कंत्राटी कर्मचारी आता शासनाच्या विरोधात एकवटले आहेत. ११ एप्रिलपासून कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. तालुकास्तरावरही कंत्राटी कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली. मात्र शासनाने निर्णय घेतला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेकडो कंत्राटी कर्मचाऱ्यांनी शनिवारी गडचिरोलीच्या जि.प. समोर शासनाच्या विरोधात निदर्शने केली. यावेळी डॉ. अनुपम महेशगौरी, डॉ. नंदू मेश्राम, रवीकिरण भडांगे, किरण रघुवंशी, रचना फुलझेले, संगीता महालदार, शरद गिरीपुंजे, मोहिता गोरेकर हजर होते.
आरोग्यसेवा प्रभावित
एनआरएचएमच अंतर्गत कार्यरत ८५० कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ११ एप्रिलपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालय व जिल्हा रूग्णालयातील आरोग्य सेवा प्रभावित झाली आहे. नियमित कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने सदर आंदोलन काळात रूग्णांची प्रचंड गैरसोय होत आहे.