कंत्राटदाराने बिलाअभावी अर्धवट सोडले काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:24 AM2021-07-20T04:24:44+5:302021-07-20T04:24:44+5:30
शहरातील सर्वोदय वॉर्डात शिव-पार्वती मंदिर ते रोहिदास मंदिर या मार्गाच्या सिमेंटीकरणाचे काम पूर्ण होऊन दीड महिना झाला आहे. पण ...
शहरातील सर्वोदय वॉर्डात शिव-पार्वती मंदिर ते रोहिदास मंदिर या मार्गाच्या सिमेंटीकरणाचे काम पूर्ण होऊन दीड महिना झाला आहे. पण या मार्गाच्या दोन्ही बाजूने पेवर ब्लॉक (गट्टू) न लावता ते काम आहे त्या स्थितीत अर्धवट सोडण्यात आले आहे. परिणामी रस्त्याच्या दोन्ही बाजूने एक फुटापेक्षा जास्त खोल दरी तयार होऊन त्या ठिकाणी पावसाचे पाणी साचत आहे. या पाण्यात तयार झालेल्या डासांमुळे नागरिकांना घरासमोर उभे राहणेही कठीण झाले आहे.
विशेष म्हणजे ज्या नागरिकांनी अतिरिक्त पैसे दिले त्यांच्या घरासमोर सिमेंट काँक्रिट टाकून घराच्या दारापर्यंत रस्ता तयार करण्यात आला. पण ज्यांनी पैसे दिले नाहीत, त्यांना एक फूट खड्ड्यातून घरात जाणे-येणे करावे लागत आहे. यामुळे दुचाकी वाहन घराच्या आवारात आणणेही त्यांना अशक्य होत आहे. नाईलाजाने त्यांना जोखीम पत्करत आपले वाहन रात्रभर रस्त्यावर ठेवावे लागत आहे. ही वाहने चोरीला गेल्यास त्या वाहनांची किंमत नगर परिषद भरून देणार की कंत्राटदार? असा प्रश्न नागरिक करू लागले आहेत.
(बॉक्स)
मुख्याधिकारी म्हणतात, पैशांसाठी अडले काम
नगर परिषदेचे खाते दुसऱ्या बँकेत स्थलांतरित करण्याच्या प्रक्रियेमुळे कंत्राटदाराचे पार्ट पेमेंट देणे बाकी आहे, त्यामुळे हे काम कंत्राटदाराने थांबवले, अशी कबुली मुख्याधिकारी संजीव ओहोळ यांनी दिली. वास्तविक अशा पद्धतीने बिल मिळाले नाही म्हणून काम अर्धवट स्थितीत थांबवणे नियमात बसत नाही. पण कंत्राटदाराच्या मनमानीपुढे नगर परिषद प्रशासनही हतबल होऊन नागरिकांना होणारा त्रास निमूटपणे सहन करत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
(बॉक्स)
नळाचे पाणी वाया जाते? जाऊ द्या
सर्वोदय वॉर्डातील याच मार्गावर खोबरागडे यांच्या घरासमोर अनेक दिवसांपासून नळाची पाईपलाईन फुटली आहे, त्यातून रात्रंदिवस पाणी वाहात आहे. याबाबत खोबरागडे यांनी तक्रार करून अनेक दिवस उलटले. पण, अजूनपर्यंत ती पाईपलाईन दुरूस्त करण्याची गरज नगर परिषदेला वाटली नाही. त्यातून दिवसाकाठी हजारो लीटर पाण्याचा अपव्यय होत आहे. आता पाऊस जास्त झाल्यानंतर रस्ते, नालीतील अस्वच्छ पाणी त्या फुटलेल्या पाईपलाईनमधून नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यात जाऊन डायरिया, काविळ यांसारखे आजार झाल्यास त्यासाठी नगर परिषदेचा संबंधित विभागच जबाबदार राहणार आहे.