कंत्राटदाराने विहिरीचे काम अर्धवटच केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2017 01:34 AM2017-05-21T01:34:05+5:302017-05-21T01:34:05+5:30

रोेजगार हमी योजनेअंतर्गत कोरेगाव येथील शेतकरी पांडुरंग मलगाम यांना विहीर मंजूर झाली.

The contractor did halfway to the well | कंत्राटदाराने विहिरीचे काम अर्धवटच केले

कंत्राटदाराने विहिरीचे काम अर्धवटच केले

Next

कारवाईची मागणी : कोरेगाव येथील शेतकरी अडचणीत; रोहयोतून विहीर मंजूर
लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : रोेजगार हमी योजनेअंतर्गत कोरेगाव येथील शेतकरी पांडुरंग मलगाम यांना विहीर मंजूर झाली. सदर काम करणाऱ्या कंत्राटदाराने केवळ १२ फूट खोल विहिरीचे बांधकाम करून विहीर अर्धवटच ठेवली आहे. सदर बांधकाम मागील तीन वर्षांपासून अर्धवट स्थितीत आहे.
आरमोरी तालुक्यातील कोरेगाव ग्राम पंचायतीचे रोजगार सेवक यांच्या आग्रहानंतर सिंचन विहिरीचे बांधकाम खासगी कंत्राटदार संजय बांबोळे यांना देण्यात आले. सन २०१५ मध्ये विहिरीचे बांधकाम पूर्ण करण्याचे आश्वासन कंत्राटदाराने शेतकऱ्याला दिले. मात्र केवळ १२ फूट बांधकाम केल्यानंतर विहिरीचे काम थांबविले. ग्राम पंचायतने कंत्राटदाराला कुशल कामाचे ९३ हजार ३९३ व अकुशल कामाचे ३३ हजार ४३८ रूपये असा एकूण १ लाख २६ हजार ८३१ रूपयांचा धनादेश संजय बांबोळे यांना दिला. विहिरीचे बांधकाम ३६ फूट खोल करायचे असताना केवळ १२ फूट बांधकाम म्हणजे अर्ध्यापेक्षाही कमी बांधकाम केले असतानाही अर्ध्यापेक्षा अधिक निधी कंत्राटदाराला देण्यात आला.
कोरेगाव ग्राम पंचायतीचे रोजगार सेवक आणि कंत्राटदार संजय बांबोळे यांनी आपली फसवणूक केली असल्याची तक्रार अन्यायग्रस्त शेतकरी परसराम मलगाम यांनी जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांच्याकडे केली आहे.

२०१४-१५ मध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत परसराम मलगाम यांना २ लाख ९७ हजार रूपयांचा निधी मंजूर झाला होता. कोणाच्या मार्फतीने त्यांनी विहिरीचे बांधकाम केले, याची आपणास माहिती नाही. १२ ते १४ फूट विहिरीचे बांधकाम झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्याच्या नावे १ लाख २६ हजारांचा धनादेश वितरित केला.
- डी. वाय. काशिवार, ग्रामसेवक, ग्राम पंचायत, कोरेगाव

 

Web Title: The contractor did halfway to the well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.