कामांच्या दिरंगाईला कंत्राटदार जबाबदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2020 05:00 AM2020-10-09T05:00:00+5:302020-10-09T05:00:31+5:30
हायब्रिड अॅन्युईटी मॉडेलची कामे घेताना नियमानुसार बांधकाम विभागाचा वाटा ६० टक्के आणि कंत्राटदाराचा ४० टक्के असा निधी बांधकामासाठी वापरण्याचा नियम घालून संबंधित कंत्राटदारांना परवानगी देण्यात आली होती. मात्र चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात अद्यापपर्यंत एकाही कंत्राटदाराने ४० टक्के निधीची उभारणी बँकेकडून कर्ज दाखवून केलेली किंवा स्वत:कडून निधीची उभारणी करून कामे पूर्ण केलेली नाहीत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात हायब्रीड अॅन्युईटी मॉडेलअंतर्गत १६०० कोटीची कामे विविध कंत्राटदारांकडून सुरू आहेत. पण बहुतांश कामे अपूर्ण स्थितीत आहेत. यावर मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा करून त्यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली. त्यावर ही कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.
हायब्रिड अॅन्युईटी मॉडेलची कामे घेताना नियमानुसार बांधकाम विभागाचा वाटा ६० टक्के आणि कंत्राटदाराचा ४० टक्के असा निधी बांधकामासाठी वापरण्याचा नियम घालून संबंधित कंत्राटदारांना परवानगी देण्यात आली होती. मात्र चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात अद्यापपर्यंत एकाही कंत्राटदाराने ४० टक्के निधीची उभारणी बँकेकडून कर्ज दाखवून केलेली किंवा स्वत:कडून निधीची उभारणी करून कामे पूर्ण केलेली नाहीत. ही बाब यावेळी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्या ना.वडेट्टीवार यांनी निदर्शनास आणून दिली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सैनिक, मुख्य अभियंता दशपुते, गडचिरोलीचे अधीक्षक अभियंता राजीव गायकवाड, कार्यकारी अभियंता साखरवाडे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
जिल्ह्यातील रस्त्यांची कामे संथगतीने सुरु असून दुरवस्था आहे. कंत्राटदार आपले पैसे वापरत नसल्याने कामे निकृष्ट होऊन मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. या रस्त्यांची कामे उत्तम दर्जाची आणि दिलेल्या कालावधीत पूर्ण व्हावीत, असे निर्देश ना.वडेट्टीवार यांनी या बैठकीदरम्यान दिले. पुढील कार्यवाहीसाठी संबंधित अधिकाऱ्यांना ना.अशोक चव्हाण यांनी निर्देश दिले.