निविदा भरण्यासाठी कंत्राटदारांची लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 12:55 AM2018-05-05T00:55:26+5:302018-05-05T00:55:26+5:30
स्थानिक नगर पालिकेच्या वतीने नगरोत्थान, नवीन नगर पालिका सहाय्य योजना, वैशिष्ट्यपूर्ण, नागरी दलितेत्तर आदी योजनांमधून जवळपास १० कोटी रूपये किमतीची ७८ कामे मंजूर करण्यात आले असून या कामांची निविदा प्रक्रिया पालिकेने हाती घेतली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : स्थानिक नगर पालिकेच्या वतीने नगरोत्थान, नवीन नगर पालिका सहाय्य योजना, वैशिष्ट्यपूर्ण, नागरी दलितेत्तर आदी योजनांमधून जवळपास १० कोटी रूपये किमतीची ७८ कामे मंजूर करण्यात आले असून या कामांची निविदा प्रक्रिया पालिकेने हाती घेतली आहे. सदर कामासाठी आॅनलाईन निविदा भरण्याची अंतिम मुदत ५ मे शनिवार आहे. त्यामुळे शुक्रवारी कंत्राटदारांची निविदा भरण्यासाठी धावपळ दिसून आली. शनिवारी सुध्दा अखेरचा दिवस असल्याने कंत्राटदारांची लगबग वाढणार आहे.
नगर पालिकेच्या नगरोत्थान योजनेतून दोन कोटींची २३ कामे मंजूर करण्यात आली. नवीन नगर पालिका सहाय्य योजनेतून २ कोटी किमतीची २५ कामे, वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून ४.३४ कोटींची २३ कामे, नागरी दलितेत्तर योजनेतून १ कोटी १६ लाख रूपये किमतीची सात कामे मंजूर करण्यात आली आहे. याशिवाय वैशिष्ट्यपूर्ण विशेष अनुदान योजनेतून हरीतपट्ट्याचे ५० लाख रूपयांचे काम गडचिरोली शहरात मंजूर करण्यात आले आहे. या सर्व कामांची आॅनलाईन निविदा भरण्याची अंतिम मुदत ५ मे २०१८ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत आहे.
शहरातील नोंदणीकृत कंत्राटदार सदर कामे करून घेण्यासाठी शासनाच्या संकेतस्थळावर निविदा भरत आहेत. यापूर्वीही पालिकेने सदर कामांची निविदा प्रक्रिया हाती घेतली होती. मात्र त्यावेळी कंत्राटदाराकडून प्रतिसाद न मिळाल्याने बहुतांश कामांची फेरनिविदा काढण्यात आली. दरम्यान नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी रिंग करून ही कामे वाटप करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र चर्चा फिसकटल्याने रिंग होऊ शकले नाही. त्यामुळे निविदा प्रक्रिया पुन्हा हाती घेऊन ही कामे उरकण्याच्या प्रयत्नात प्रशासन आहे. सदर कामांमध्ये ओपन स्पेस विकसीत करणे, शहरातील नाल्या व रस्त्यांचे बांधकाम, डांबरीकरण व इतर कामांचा समावेश आहे. पदाधिकाºयांच्या मतभेदामुळे न.प.तर्फे कामांच्या निविदा प्रक्रियेत बºयाचदा विलंब होत असतो.
तांत्रिक त्रुटी दूर करून फेरनिविदा काढा, कंत्राटदारांची मागणी
नगर पालिकेने काढलेल्या अनेक कामांच्या टेंडर नोटीस व शेड्युल बीच्या रकमेमध्ये बरीच तफावत आहे. यातील त्रुट्या दुरूस्त करून कामांची फेरनिविदा काढण्यात यावी, अशी मागणी गडचिरोली जिल्हा कंत्राटदार असोसिएशनच्या वतीने पालिका प्रशासनाकडे करण्यात आली आहे. दरम्यान कंत्राटदार असोसिएशनचे सहसचिव अजय तुम्मावार यांच्या नेतृत्वात अनेक कंत्राटदारांनी शुक्रवारी थेट पालिकेच्या कार्यालयात जाऊन मुख्याधिकारी कृष्णा निपाने यांची भेट घेऊन त्यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली.
यापूर्वीही संघटनेच्या वतीने न.प. मुख्याधिकाऱ्यांना त्रुट्या दुरूस्त करून निविदा भरण्याची मुदत वाढविण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र प्रशासनाने केवळ निविदा भरण्याची मुदत वाढविली. त्रुटी दुरूस्त केल्या नाही. त्यामुळे कामांची आॅनलाईन निविदा भरताना कंत्राटदारांना बऱ्याच अडचणी आल्या. त्यामुळे कंत्राटदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट मुख्याधिकाऱ्यांची शुक्रवारी भेट घेतली. निविदा भरण्याच्या अंतिम दिवशी डीडी सादर करण्याबाबतची अडचणही कंत्राटदारांनी त्यांना सांगितली.
शहरातील विकास कामे लांबणीवर पडणार
विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच गडचिरोली नगरपालिकेच्या वतीने सदर ७८ कामांची निविदा प्रक्रिया हाती घेण्यात आली. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सुरू राहणार आहे. वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या मतदार संघाच्या निवडणुकीची आचारसंहिता २९ मे पर्यंत आहे. कंत्राटदाराकडून प्राप्त झालेल्या कामांच्या निविदा पालिका प्रशासनाच्या वतीने विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर उघडण्यात येणार आहे. त्यानंतर जूनपासून पावसाळ्याला सुरूवात होणार आहे. त्यामुळे ही कामे लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष करून पावसाळ्यात डांबरीकरणाची कामे केली जात नाही.