शिक्षण घेऊन जिल्हा विकासाला हातभार लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 01:24 AM2018-03-14T01:24:28+5:302018-03-14T01:24:28+5:30

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श बाळगून विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे लक्ष केंद्रीत केले पाहिजे.

Contribute to district development through education | शिक्षण घेऊन जिल्हा विकासाला हातभार लावा

शिक्षण घेऊन जिल्हा विकासाला हातभार लावा

googlenewsNext
ठळक मुद्देपोलीस उपअधीक्षकांचे आवाहन : महाराष्टÑ दर्शन सहलीतील गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांशी साधला संवाद

ऑनलाईन लोकमत
गडचिरोली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श बाळगून विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे लक्ष केंद्रीत केले पाहिजे. शिक्षण पूर्ण करून गडचिरोली जिल्ह्याच्या विकासात हातभार लावा, असे आवाहन नक्षलविरोधी अभियानाचे पोलीस उपअधीक्षक संजीव म्हैसेकर यांनी केले.
शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची महाराष्टÑ दर्शन सहल नागपुरात पोहोचली. यावेळी अपारंपरिक अभियान प्रशिक्षण केंद्राच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात म्हैसेकर यांनी सहलीतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर प्रशिक्षण केंद्राचे उपप्राचार्य तथा पोलीस उपअधीक्षक दीपक पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाला पोलीस उपनिरीक्षक जगदाळे, महिला पोलीस उपनिरीक्षक चौधरी, पोलीस हवालदार दिनकर चांभारे, नायक पोलीस शिपाई सुभाष तानोडकर, देवशरण यादव आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना संजीव म्हैसेकर म्हणाले, नक्षली हे केवळ स्वत:च्या स्वार्थासाठी खोट्या भुलथापा देऊन लहान वयात विद्यार्थ्यांना नक्षल चळवळीत सहभागी करीत असतात. ज्येष्ठ नक्षली नेते हे आदिवासी व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवून स्वत:च्या मुलांना चांगले शिक्षण देत आहेत. त्यांची मुले उच्च शिक्षीत असून अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये लठ्ठ पगारावर नोकरीला आहेत. सातत्याने आदिवासी बांधवांची दिशाभूल होत असून नक्षल्यांकडून गडचिरोलीतील शिक्षण, आरोग्य व इतर पायाभूत सुविधांना विरोध करून गडचिरोलीच्या विकासात अडथळा निर्माण केला जात आहे. नक्षलवादी शासनाच्या विकासकामांना विरोध करतात. यामुळे नक्षल्यांचा हेतू काय आहे, हे स्पष्ट दिसून येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. विद्यार्थ्यांनी नक्षल्यांच्या कुठल्याही गोष्टीकडे लक्ष न देता आपले लक्ष केवळ शिक्षणाकडे केंद्रीत करावे. शिक्षणामुळे चांगली व वाईट विचारसरणी काय आहे, हे आपल्याला कळेल. त्यामुळे शिक्षणाद्वारे स्वत:चा व गडचिरोलीचा विकास करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी पाटील म्हणाले, गडचिरोलीच्या विकासासाठी शासन कटीबध्द असून विद्यार्थी हे गडचिरोली व देशाचे भविष्य आहेत. विद्यार्थ्यांना या सहलीच्या माध्यमातून गडचिरोलीच्या बाहेरील जिवनाचे प्रत्यक्ष निरीक्षण करता आल्यामुळे पुढील आयुष्यासाठी नवी दिशा मिळाली आहे. याचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी पुढे उच्च शिक्षण घ्यावे. स्वत:ची प्रगती करून गडचिरोलीच्या विकासासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
ही १९ वी सहल असून यात गडचिरोली जिल्ह्यात दुर्गम व अतिदुर्गम भागातील एकूण ७८ विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. या सहलीतील विद्यार्थ्यांनी मुंबई, पुणे, नाशिक, शेगाव, नागपूर आदी शहरांना भेटी देऊन तेथील शहरांचा झालेल्या औद्योगिक, शैक्षणिक विकास आदींची माहिती जाणून घेतली. यावेळी विद्यार्थ्यांनी नागपूरातील रमन विज्ञान केंद्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, दीक्षाभूमी आदीसह विविध ठिकाणांना भेटी देऊन विविध माहिती जाणून घेतली. विद्यार्थ्यांना चित्रपटगृहात नेऊन बाळ भीमराव हा चित्रपट त्यांना दाखविण्यात आला. तसेच तेथील कलाकारांशी संवाद साधण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रभारी सहायक संचालक हंसराज राऊत यांनी केले.
प्रदर्शनातील चित्रे विद्यार्थ्यांनी न्याहाळली
यवतमाळ येथे पोलीस हवालदार शेखर मारोतराव वांढरे हे चित्रकार आहेत. त्यांनी आपल्या चित्रांचे प्रदर्शन नागपूर येथील अपारंपरिक अभियान प्रशिक्षण केंद्रात लावले आहे. महाराष्टÑ दर्शन सहलीत सहभागी झालेल्या गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी या चित्रकला प्रदर्शनाला भेट दिली. वांढरे यांनी काढलेली चित्रे न्याहाळली. यावेळी वांढरे यांनी विद्यार्थ्यांना आदिवासी वारली चित्रकलेबाबत मार्गदर्शन केले. याप्रसंगी यवतमाळचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रशेखर सवाने, पोलीस शिपाई महेंद्र शेंदुरकर हेसुद्धा उपस्थित होते.

Web Title: Contribute to district development through education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.