रोहयोचा शेती विकासाला हातभार
By admin | Published: May 29, 2014 02:22 AM2014-05-29T02:22:00+5:302014-05-29T02:22:00+5:30
ग्रामीण भागातील रोजगाराची समस्या सोडविण्याबरोबरच या भागाचा विकास करण्याच्या उद्देशाने केंद्र ..
गडचिरोली : ग्रामीण भागातील रोजगाराची समस्या सोडविण्याबरोबरच या भागाचा विकास करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात शेती विकासाशी संबंधित १ कोटी ७ लाख ८४ हजार रूपयाची कामे वर्षभरात केली आहेत. यामध्ये विशेष करून सिंचनावर भर देण्यात आला आहे. देशाची सुमारे ७0 टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. त्यामुळे या लोकसंख्येच्या विकासाशिवाय देशाचा विकास होणे शक्य नाही. ग्रामीण भागातील बहुतांश लोकसंख्या शेतीवर जीवन जगत आहे. मात्र शेतीमध्ये जलसिंचनाची सुविधा उपलब्ध नसल्याने केवळ चार महिन्याचा रोजगार प्राप्त होतो. उर्वरित ८ महिने शेतकर्याला बसून खावे लागत होते. परिणामी आर्थिक परिस्थिती सुधारण्यात फार मोठा अडथळा निर्माण होत होता. या सर्व बाबींचा विचार करून केंद्र शासनाने २५ ऑगस्ट २00५ रोजी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम काढून रोजगार हमी योजना सुरू केली. या योजनेंतर्गत देशभरातील लाखो नागरिकांना रोजगार प्राप्त झाला आहे. गडचिरोली जिल्ह्यातही रोजगार हमी योजनेची यशस्वीपणे अंमलबजावणी केली जात आहे. या योजनेंतर्गत हजारो ग्रामीण नागरिकांना रोजगार प्राप्त झाला आहे. त्याचबरोबर या योजनेतून शेती विकासाशी संबंधित कामे केली जात असल्याने शेती विकासाला सुध्दा मदत झाली आहे. २0११-१२ या आर्थिक वर्षामध्ये रोजगार हमी योजनेतून सुमारे २ कोटी ४९ लाख ९६ हजार रूपयाची कामे करण्यात आली. या निधीतून जिल्हाभरात २ शेततळे बांधण्यात आले. ७९ बोडींची दुरूस्ती करण्यात आली. १५ नाल्यांवरील बंधार्यांचे बांधकाम, ८५ धानाच्या बांधींची निर्मिती व ४८ बांधींची दुरूस्ती करण्यात आली. आर्थिक वर्ष २0१२-१३ मध्ये रोजगार हमी योजनेतून शेती विकासावर १ कोटी ६ लाख ७५ हजार रूपये खर्च करण्यात आले. या निधीतून १८ शेततळे, ३१ बोडींची दुरूस्ती, ९ बंधार्यांचे बांधकाम करण्यात आले. १५ बांधींची निर्मिती करून ४ बांधींची दुरूस्ती करण्यात आली. २0१३-१४ मध्ये १ कोटी ७ लाख ८४ हजार रूपये खर्च करण्यात आले. यातून ३६ शेततळे, २५ बोडींची दुरूस्ती, ७ बंधारे, २३ धानाच्या बांधींची निर्मिती व २१ बांधींची दुरूस्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर कृषी विभागाने यावर्षी २0 लाख ४८ हजार रूपये शतकोटी वृक्ष लागवड योजनेवर खर्च केले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात चामोर्शी तालुक्यातील कन्नमवार जलाशय वगळता एकही मोठा जलसिंचन प्रकल्प नाही. जिल्ह्यात धान पिकाचे सर्वात जास्त उत्पादन घेतले जाते. या पिकाला अगदी सुरूवातीपासून तर धानपिक निघेपर्यंत सिंचनाची गरज भासते. धानपिकाला सिंचन तलाव व बोडींच्या सहाय्याने केले जाते. मात्र शतकापूर्वी बांधण्यात आलेल्या बोडींची अत्यंत दूरवस्था झाली आहे. बर्याचशा बोडींची पाळ फुटण्याच्या मार्गावर आहेत. तर काही बोडी बुजल्याने पाणी साठविण्याची क्षमताही कमी झाली आहे. बोडी दुरूस्तीसाठी लाखो रूपयाचा खर्च येत असल्याने शेतकरी वर्ग एवढा खर्च करून बोडींची दुरूस्ती करण्यास तयार होत नव्हता. त्यामुळे बोड्या नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला असतानाच कृषी विभागाने या बोडींची दुरूस्ती करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यामुळे बोडींना नवसंजीवनी मिळून शेती उत्पादनात वाढ झाली आहे. (नगर प्रतिनिधी)