वादग्रस्त वैद्यकीय अधिकाऱ्याची अखेर उचलबांगडी ! माधुरी किलनाके नव्या 'सीएस'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2024 02:30 PM2024-08-17T14:30:30+5:302024-08-17T14:31:17+5:30

Gadchiroli : 'लोकमत'चा दणका अनिल रुडेंकडील पदभार काढला

Controversial medical officer finally thrown out! Madhuri Kilnake New 'CS' | वादग्रस्त वैद्यकीय अधिकाऱ्याची अखेर उचलबांगडी ! माधुरी किलनाके नव्या 'सीएस'

Controversial medical officer finally thrown out! Madhuri Kilnake New 'CS'

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली :
गैरव्यवहाराचे आरोप, वादग्रस्त कारकीर्दीमुळे चर्चेत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रुडे यांच्याकडील जिल्हा शल्यचिकित्सकपदाचा अतिरिक्त पदभार अखेर १६ ऑगस्टला काढून घेतला. जिल्हा शल्यचिकित्सकपदी याच रुग्णालयात कार्यरत वैद्यकीय अधिकारी (वर्ग १) डॉ. माधुरी किलनाके यांच्या नियुक्तीचे आदेश उपसंचालक (आरोग्य सेवा) डॉ. कांचन वानेरे यांनी काढले. 'लोकमत'ने याबाबत वृत्त प्रकाशित करून आरोग्य विभागातील नियुक्त्यांमधील सावळा गोंधळ चव्हाट्यावर आणला होता.


जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांनी सेवानिवृत्तीच्या मुदतवाढीसंदर्भात महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट) नागपूर येथे दाद मागितली होती. मात्र, २९ जुलै २०२४ रोजी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे जागा रिक्त झाली होती. डॉ. माधुरी किलनाके या वर्ग १ अधिकारी असतानाही त्यांना डावलून वर्षभरापूर्वीच निवृत्त झालेले व विशेष बाब म्हणून पुन्हा सेवेत आलेले रुग्णालय प्रशिक्षण केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रुडे यांच्याकडे जिल्हा शल्यचिकित्सक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. विशेष म्हणजे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, सर्जन व इतर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीत मर्जीतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन डॉ. रुडे हे लगबगीने जिल्हा शल्यचिकित्सक पदाच्या खुर्चीत बसले होते. डॉ. रुडेंविरुद्ध उपसंचालकांकडे तक्रारी होत्या. तसेच गोंदियातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फतही त्यांची चौकशी सुरू आहे.


'लोकमत'ने १४ ऑगस्ट रोजी वृत्त प्रकाशित करून याकडे लक्ष वेधले होते. यानंतर आरोग्य विभागाने १६ ऑगस्ट रोजी डॉ. माधुरी किलनाके यांची विनंतीनुसार गडचिरोलीच्या जिल्हा शल्यचिकित्सकपदी नियुक्ती केली.


रुडे हटाव... काँग्रेसचे आंदोलन जाहिर निषेध !
दरम्यान, १६ ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजता काँग्रेस महिला आघाडी जिल्हाध्यक्षा अॅड. कविता मोहरकर यांनी शहरातील इंदिरा गांधी चौकात डॉ. अनिल रुडे हटाव.... जिल्हा रुग्णालय बचाव.. अशी घोषणाबाजी करून निदर्शने केली. त्यानंतर जिल्हाधिकारी संजय देने यांना निवेदन दिले. हे आंदोलन झाल्यानंतर तासाभरातच डॉ. रुडे यांना हटविल्याचे आदेश धडकले.

Web Title: Controversial medical officer finally thrown out! Madhuri Kilnake New 'CS'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.