ट्विटरवर वादग्रस्त पोस्ट, पुणे-नागपूरातून दोघांना उचलले; कारवाईनंतर जितेंद्र आव्हाडांचा ट्विटरहल्ला
By संजय तिपाले | Published: June 21, 2023 05:52 PM2023-06-21T17:52:16+5:302023-06-21T17:53:07+5:30
चव्हाणला गडचिरोली पोलिसांनी पुण्यातील शिवाजीनगरमधून ताब्यात घेतले, पण त्यांच्याकडे अटक वॉरंट नव्हते, अंगात पोलिसांचा ड्रेसही नव्हता.
गडचिरोली : ट्विटरवरुन वादग्रस्त पोस्ट केल्याच्या आरोपाखाली गडचिरोलीपोलिसांनी २१ जून रोजी पुणे व नागपूर येथून दोघांना ताब्यात घेतले. दरम्यान, पुण्यातून एका युवकास ताब्यात घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवरुन गडचिरोली पोलिसांच्या कारवाईवर आक्षेप घेऊन महाराष्ट्रात हा काय प्रकार सुरु आहे, असा सवाल केला.
आदित्य चव्हाण व भारत पोरेडी अशी ताब्यात घेतलेल्या संशियत आरोपींची नावे आहेत. चव्हाणला पुण्यातून तर पोरेडीला नागपूर येथून २१ रोजी पहाटे ताब्यात घेतले आहे. गडचिरोली ठाण्यात ३१ मे २०२३ रोजी दोन ट्विटर हँडलरवर गुन्हा नोंद झाला होता. आक्षेपार्ह व वादग्रस्त मजकूर पोस्ट करुन जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा तक्रारदाराचा आरोप होता. दरम्यान, पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलने याचा तांत्रिक तपास केला.
ट्विटर तसेच एका खासगी मोबाइल कंपनीकडून मागविलेल्या तपशीलावरुन आदित्य चव्हाण व भारत पोरेडी यांनी हे ट्विटर अकाऊंड हाताळल्याचे समोर आले. त्यानंतर गुन्हे शाखेची दोन पथके पोलिस अधीक्षक नीलोत्पल व पो.नि.उल्हास भुसारी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी शोधकामी रवाना झाली. २१ जून रोजी पहाटे पुण्यातून आदित्य चव्हाण व नागपूर येथून भारत पोरेडी यांना अटक करण्यात आली.
शुभम चव्हाण ला गडचिरोली पोलिसांनी खाजगी गाडीतून खजगी गाडीतून नेले आहे पुण्याहून
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 21, 2023
काही झाले तर सरकार जबाबदार@CMOMaharashtra
आव्हाडांनी काय केला आरोप ?
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर पोस्ट करुन गडचिरोली पोलिसांच्या कारवाईबाबत आरोप केला. त्यानुसार, चव्हाणला गडचिरोली पोलिसांनी पुण्यातील शिवाजीनगरमधून ताब्यात घेतले, पण त्यांच्याकडे अटक वॉरंट नव्हते, अंगात पोलिसांचा ड्रेसही नव्हता. आई- बहिणीने अडविले असता त्यास चतु:श्रृंगी ठाण्यात घेऊन गेले. पोलिसांनी त्याच्या आई- बहिणीशी वाद घातला व नंतर खासगी गाडीत घेऊन गेले. अंगात खाकी वर्दीही नव्हती. त्याच्या जीवाचे बरेवाईट झाले तर संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्र सरकारची राहील, असे जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. चव्हाणच्या आईने हा संपूर्ण घटनाक्रम चतु:श्र्रुंगी ठाण्यातून सांगितल्याचाही पोस्टमध्ये उल्लेख आहे.
गडचिरोली पोलिस ठाण्यात ३१ मे रोजी गुन्हा नोंद झाला होता. त्याचा तांत्रिक तपास केल्यावर २० दिवसांनी दोन आरोपी निष्पन्न झाले. नागपूर व पुण्यात त्यांना ताब्यात घेतले असून पथक गडचिरोलीला येत आहे. संपूर्ण कारवाई ही कायदेशीर आहे.
- नीलोत्पल, पोलिस अधीक्षक, गडचिरोली
--