पर्लकोटावरील जुन्या पुलाचे बंधाऱ्यात रूपांतर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 05:00 AM2021-05-19T05:00:00+5:302021-05-19T05:00:33+5:30
यावर्षी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच पर्लकोटा नदीचे पात्र कोरडे झाल्याने भामरागडवासीयांची चिंता वाढली आहे. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे पर्लकोटा नदीला संजीवनी मिळाली. अचानक पात्रातील पाणी वाढले. नवीन पुलाच्या बांधकामासाठी नदीपात्रात तयार केलेल्या तात्पुरत्या रस्त्यामुळे नदीतील वाहून जाणारे पाणी थांबून बंधाऱ्यासारखे स्वरूप आले आहे. त्यातूनच अनेकांनी जुन्या पुलाचे रूपांतर बंधाऱ्यात करण्याची कल्पना सुचवली आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : पर्लकोटा नदीवर नवीन उंच पुलाचे बांधकाम केले जात आहे. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या जुन्या पुलाचे रूपांतर बंधाऱ्यात करून वाहून जाणारे पाणी अडविल्यास उन्हाळ्यात भामरागडमधील भूजल पातळी कमी होणार नाही, असे मत नगरवासीयांकडून व्यक्त होत आहे.
जिल्ह्यातील भामरागडच्या घनदाट जंगलात दरवर्षी भरपूर पाऊस पडतो; पण अलीकडे झपाट्याने जंगल नष्ट होत आहे. त्यामुळे तापमानात दिवसागणित वाढ होण्यासोबतच भूजल पातळीही खालावत आहे. पर्लकोटा, पामुलगौतम, इंद्रवती या तीनही नद्या पावसाळ्यात दुथडी भरून वाहतात. मात्र, पावसाळा संपताच कोरड्या पडतात.
यावर्षी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच पर्लकोटा नदीचे पात्र कोरडे झाल्याने भामरागडवासीयांची चिंता वाढली आहे. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे पर्लकोटा नदीला संजीवनी मिळाली. अचानक पात्रातील पाणी वाढले. नवीन पुलाच्या बांधकामासाठी नदीपात्रात तयार केलेल्या तात्पुरत्या रस्त्यामुळे नदीतील वाहून जाणारे पाणी थांबून बंधाऱ्यासारखे स्वरूप आले आहे. त्यातूनच अनेकांनी जुन्या पुलाचे रूपांतर बंधाऱ्यात करण्याची कल्पना सुचवली आहे.
भूजल पुनर्भरणाची गरज लक्षात घेऊन ‘पाणी अडवा-पाणी जिरवा’ ही राज्य सरकारची जुनीच संकल्पना गांभीर्याने राबविणे काळाची गरज झालेली आहे.
शेजारील चंद्रपूर जिल्ह्यात जानाळा-पोंबुर्णा मार्गावरील अंधारी नदीवर याच पद्धतीने जुन्या पुलाचे रूपांतर बंधाऱ्यात केले आहे.
पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांकडून वाढल्या अपेक्षा
गेल्या २० वर्षांपासून पर्लकोटा नदीवरील पुलाचे बांधकाम करण्याची मागणी होत आहे. हे बांधकाम सुरू झाल्यानंतर वनविभागाच्या आडकाठीने पुन्हा थांबले होते. कंत्राटदारसुद्धा पळ काढण्याच्या तयारी होते; परंतु पालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी विशेष लक्ष देऊन मंत्रालयात केलेल्या पाठपुराव्याने या कामातील अडथळे दूर होऊन हे काम पुन्हा सुरू करण्यात आले. त्यामुळे त्यांच्याकडून भामरागडवासीयांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. जुन्या पुलाचे रूपांतर बंधाऱ्यात करण्यासाठीही ते सकारात्मक दृष्टिकोन ठेवून भामरागडवासीयांच्या अपेक्षा पूर्ण करतील, असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत.