शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा
By admin | Published: June 30, 2016 01:30 AM2016-06-30T01:30:13+5:302016-06-30T01:30:13+5:30
आपल्या सर्वांच्या जीवनात पाण्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे पाण्यामध्ये सर्वाेत्तम गुणवत्ता असणे गरजेचे आहे.
पालकमंत्र्यांचे प्रतिपादन : जिल्हास्तरीय पाणी गुणवत्ता कार्यशाळा
गडचिरोली : आपल्या सर्वांच्या जीवनात पाण्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे पाण्यामध्ये सर्वाेत्तम गुणवत्ता असणे गरजेचे आहे. पिण्याचे शुद्ध पाणी ग्रामस्थांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वय ठेवावा, असे प्रतिपादन आदिवासी विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले.
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष जि. प. गडचिरोली व पाणी गुणवत्ता संनियंत्रण सर्वेक्षण कार्यक्रम यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी जि. प. च्या वीर बाबुराव शेडमाके सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय पाणी गुणवत्ता कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प. अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे होते. प्रमुख अतिथी म्हणून जि. प. उपाध्यक्ष जीवन नाट, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी आर. जी. जावळेकर, कृषी सभापती अजय कंकडलावार, महिला व बालकल्याण सभापती सुवर्णा खरवडे, विकास विभागाचे उपायुक्त अनिल नवाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) शालिकराम धनकर, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता के. आर. घोडमारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सी. के. माळी, उपअभियंता रोडे, विशाल देशमुख आदी उपस्थित होते.
पुढे बोलतांना पालकमंत्री आत्राम म्हणाले, जनतेला शुद्ध पिण्याचे पाणी पुरवठा करणे हे शासनाचे ध्येय आहे. गडचिरोली जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र यातील काही पाणीसाठे क्लोराईडमुळे तसेच अन्य रासायनिक प्रदूषणामुळे दूषित झाले आहेत. तेव्हा योग्य तपासणी करून सदर पाणीसाठी पिण्यासाठी बंद करावे, पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा जनतेला करावा यासाठी यंत्रणांनी जनजागृती करून लोकांचा सहभाग वाढवावा, असेही पालकमंत्री आत्राम म्हणाले.
याप्रसंगी जि. प. प्रशांत कुत्तरमारे म्हणाले, पिण्याचे शुद्ध पाणी अशुद्ध होण्याचे मुख्य कारण, उघड्यावर शौचविधी करणे हे आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या घरी शौचालय बांधून त्याचा नियमित वापर करावा, जेणेकरून शुद्ध पाण्याचे स्त्रोत अशुद्ध होणार नाही. संचालन जि. प. च्या नरेगा विभागाचे बीडीओ शालिकराम पडघम, प्रास्ताविक अरविंद कोडापे यांनी केले तर आभार कार्यकारी अभियंता घोडमारे यांनी मानले. (स्थानिक प्रतिनिधी)