कोरोनाने पालक गमावलेल्या बालकांना सरकारी मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:38 AM2021-07-27T04:38:41+5:302021-07-27T04:38:41+5:30
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे स्थानिक नागरिकांनी कोविडसंदर्भात शासनाला सहकार्य करण्यासाठी देणगी स्वरूपात जो निधी जमा केलेला आहे त्या निधीतून ...
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे स्थानिक नागरिकांनी कोविडसंदर्भात शासनाला सहकार्य करण्यासाठी देणगी स्वरूपात जो निधी जमा केलेला आहे त्या निधीतून अशा अनाथ बालकांना मदतीचा हात देण्यात आला. आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे देणगी स्वरूपात आलेल्या निधीतून ३ लाख ६० हजार ७५७ रुपयांचा निधी अनाथ व एक पालक गमावलेल्या बालकांना सानुग्रह अनुदान म्हणून मंजूर करण्यात आला. दोन्ही पालक गमावलेल्या १० बालकांना प्रतिबालक १० हजार ५५५ रुपये, तर एक पालक गमावलेल्या (आई किंवा वडील) १०२ बालकांना प्रत्येकी २५०१ प्रमाणे निधी मंजूर करण्यात आला. त्यातील निवडक बालकांना जिल्हाधिकारी सिंगला यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले.
लाभार्थी बालक आणि नातेवाइकांसोबत जिल्हाधिकारी सिंगला यांनी सविस्तर चर्चा केली. त्यांना काही अडचण असल्यास प्रत्यक्ष माझ्यासोबत तसेच जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांसोबत संपर्क करण्याची सूचना त्यांनी केली. आपल्या सर्वासोबत शासन सक्षमपणे उभे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी जी.एम. तळपाडे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नारायण परांडे, समिती सदस्य तथा जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, जिल्हा परिविक्षा अधिकारी विनोद पाटील, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी अविनाश गुरुनुले, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कृष्णा रेड्डी, बाल संरक्षण अधिकारी प्रियंका आसुटकर, सामाजिक कार्यकर्ते जयंत जथाडे, उज्ज्वला नाकाडे, संरक्षण अधिकारी मनेश्वर कंरगामी, क्षेत्र कार्यकर्ता नीलेश देशमुख आदी प्रामुख्याने उपस्थित होते.