बैलपोळा सणावर यंदाही कोरोनाचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:19 AM2021-09-02T05:19:09+5:302021-09-02T05:19:09+5:30
चामोर्शी : प्राणी मात्रावर दया करा असा शुभ संदेश देणारा पोळा हा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र ...
चामोर्शी : प्राणी मात्रावर दया करा असा शुभ संदेश देणारा पोळा हा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र सलग दुसऱ्याही वर्षी कोरोनाचे निर्बंध पाळत बैल पोळा साधेपणाने साजरा होणार आहे. त्यामुळे सलग दुसऱ्याही वर्षी सर्जा- राजाच्या सणावर कोरोनाचे सावट दिसून येत आहेत.
पोळा हा सण श्रावण अमावस्याला येणारा सण आहे. वर्षभर शेतात राबराब करणाऱ्या बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आहे. सणाच्या आठवडाभरापासून शेतकरी बैलांना लागणाऱ्या साज श्रुंगार खरेदीचे बेत आखून ते खरेदी करीत असतात. मात्र कोरोनाचे सावट असल्याने शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. त्यामुळे बैल पोळा काही दिवसावर येऊन ठेपला असतानासुध्दा शेतकऱ्यांमध्ये फारसा उत्साह दिसून येत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
शेतकऱ्यांना वर्षभर सवंगडीसारखा त्यांच्या पाठीशी उभा राहून शेतकऱ्यांना मदत करणारी सर्जा राजाची जोडी शेतकऱ्यांना प्राणप्रिय अशी असते. यासाठी शेतकरी बैलांना साज श्रुंगार घालून महादेव मंदिर जवळ नेत असतात. गतवर्षी पोळा सणादरम्यान लॉकडाऊन असल्याने पोळा साधेपणाने साजरा झाला होता. यावर्षी तरी आनंदाने सर्जा राजाला पुरण पोळीचा घास भरवू, असे शेतकऱ्यांना मनोमन वाटत होते. मात्र कोरोनाचे निर्बंध असल्याने पोळा हा सण साधेपणाने साजरा करावे लागणार आहे, त्यामुळे शेतकरी बैलांना लागणाऱ्या साज शृंगार खरेदीकडे कानाडोळा करीत आहे.
पोळा या सणानंतर लाकडी बैलाचा तान्हा पोळा हा सण साजरा केला जात असतो, मात्र बाल गोपालांच्या तान्हा पोळा सणावारसुद्धा विरजण पडले आहे. सलग दुसऱ्याही वर्षी पोळा या सणावर कोरोनाचे सावट असल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे.
बॉक्स : शेती कामात यंत्रांचा शिरकाव
बदलत्या काळानुसार प्रत्येक क्षेत्रात आमूलाग्र बदल घडून येत असून पाहता पाहता शेतातील कामे यंत्रांच्या साहाय्याने केली जात आहेत. त्यामुळे गोधन संख्या कमालीची घटली असून काही गावात ट्रॅक्टर पोळासुध्दा गेल्या दोन तीन वर्षांपासून भरविला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जनावरे पाळणे कठीण जात असल्याने शेतकरी पूर्वापार चालत आलेली शेतातील कामे आता बैलजोडी ऐवजी सर्रास ट्रॅक्टरच्या साहाय्याने केली जात असून याचा सुद्धा परिणाम बैलपोळा सणावर पडलेला दिसून येत आहे.
काेट
गतवर्षी लॉकडाऊन काळात पोळा सण आला होता, त्यामुळे शेतकऱ्यांनी साधेपणाने पोळा सण साजरा केला होता. मात्र यावर्षी पोळा आनंदात जाईल अशी अपेक्षा असताना कोरोनाचे निर्बंध आड आले आहे. अशातच आठवडी बाजार बंद असल्याने बैल साज शृंगार खरेदी करण्याकडे फारसा कल दिसून येत नाही. साज शृंगार विक्रीवर परिणाम पडलेला दिसून येत आहे.
आनंदराव चालीगांजीवार, बैलजोडी साज श्रुंगार विक्रेते, रामसागर
010921\img_20190830_163859.jpg
बैलपोळ्याचे मागील ३ वर्षाआधीचे चामोर्शी येथील फोटो