कोरोनाचा वेग मंदावला; पण आता डेंग्यू, मलेरियाची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 05:00 AM2021-06-09T05:00:00+5:302021-06-09T05:00:27+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप आता बऱ्यापैकी कमी झाल्यामुळे नागरिकांमधील कोरोनाची दहशतही काही प्रमाणात कमी झाली ...

Corona slowed down; But now the fear of dengue, malaria | कोरोनाचा वेग मंदावला; पण आता डेंग्यू, मलेरियाची भीती

कोरोनाचा वेग मंदावला; पण आता डेंग्यू, मलेरियाची भीती

Next
ठळक मुद्देगेल्यावर्षी ६,४८५ जणांना ग्रासले : सात जणांचा झाला होता मृत्यू

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप आता बऱ्यापैकी कमी झाल्यामुळे नागरिकांमधील कोरोनाची दहशतही काही प्रमाणात कमी झाली आहे; पण पावसाळ्याला सुरुवात झाल्यामुळे आता मलेरिया, डेंग्यू आणि मेंदुज्वरासारख्या आजारांसाठी पोषक वातावरण तयार होत आहे. गेल्यावर्षी या आजारांनी साडेसहा हजार नागरिकांना ग्रासले होते. याशिवाय ७ जणांचा बळीही घेतला होता. 
जंगलाचा प्रदेश असल्यामुळे ग्रामीण भागात पावसाळ्याला सुरुवात झाली की, ठिकठिकाणी पाणी साचून डासांची उत्पत्ती वाढते. त्यातून सर्वाधिक प्रमाणात मलेरिया पसरतो. २०१७ पासूनचे आकडे पाहिल्यास जिल्ह्यात दरवर्षी मलेरियाचे अडीच हजार ते साडेसहा हजार, असे रुग्ण आढळले आहेत. त्यात गेल्या साडेचार वर्षांत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय मेंदुज्वरानेही सात जण दगावले आहेत. 
यावर्षी जानेवारी ते मे २०२१ या पाच महिन्यांत मलेरियाचे १,२४४ रुग्ण आढळले.  दोघांचा  मृत्यूही  झाला; पण जून ते डिसेंबर या कालावधीत डासांचे प्रमाण सर्वाधिक राहत असल्याने रुग्ण वाढण्याची शक्यता आहे.

... ही घ्या काळजी

- डासांची उत्पत्ती होऊ नये म्हणून घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा, पाण्याचे डबके साचणार नाही, याची दक्षता घ्या. नेहमी साचणाऱ्या पाण्याच्या डबक्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना सांगून गप्पी मासे सोडा.

- संध्याकाळच्या वेळी घराची दारे-खिडक्या बंद ठेवा. रात्रीच्या वेळी झोपताना मच्छरदाणीचा वापर करा. यामुळे डासांचा दंश होणार नाही आणि डासजन्य आजार होणार नाहीत.

- डासनाशकाची फवारणी करण्यासाठी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करा. घरात सर्वत्र फवारणी करून घ्या. नाली किंवा डबक्यात अधूनमधून रॉकेलसारखे तेलजन्य पदार्थ टाका.

जंगलामुळे गडचिरोली जिल्ह्यात मलेरियाचे प्रमाण सर्वांत जास्त आहे. त्यामुळे दरवर्षी मच्छरदाण्यांचे वाटप केले जाते; पण लोक त्यांचा योग्य वापर करत नाहीत. तो केल्यास डासांमुळे होणाऱ्या आजारांपासून बचाव होऊ शकतो.
-डॉ. कुणाल मोडक, जिल्हा हिवताप अधिकारी

 

Web Title: Corona slowed down; But now the fear of dengue, malaria

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.