ब्रह्मपुरीच्या कोरोनाबाधिताचा गडचिरोलीत मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 06:01 PM2020-09-09T18:01:36+5:302020-09-09T18:01:57+5:30
गडचिरोलीत कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर येथे उपचारासाठी दाखल केलेल्या पहिल्याच रुग्णाचा मृत्यू झाला आहे. हा रुग्ण ब्रह्मपुरीचा असल्यामुळे त्याची नोंद चंद्रपूर जिल्ह्यात झाली असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोलीत कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर येथे उपचारासाठी दाखल केलेल्या पहिल्याच रुग्णाचा मृत्यू झाला आहे. हा रुग्ण ब्रह्मपुरीचा असल्यामुळे त्याची नोंद चंद्रपूर जिल्ह्यात झाली असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. दरम्यान मंगळवारी भर पडलेल्या नवीन रुग्णांमुळे एकूण बाधित संख्या १३२९ वर पोहोचली आहे.
दि.६ सप्टेंबर रोजी पहाटे २.३० वाजता ब्रह्मपुरी येथील रहिवासी असलेल्या एका ४७ वर्षीय व्यक्तीला जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांना ताप, झटके येणे व श्वसनास त्रास होता. रुग्णालयात आणल्यानंतर त्यांच्यावर तातडीने उपचार प्रक्रि या सुरू करण्यात आली. लक्षणे पाहून सदर रूग्णाची ट्रूनॅट तपासणी करण्यात आली. त्यात त्यांचा कोरोना अहवाल सकारात्मक आला. यादरम्यान उपचार सुरू असताना सकाळी ७.४५ वाजता त्यांची प्रकृती आणखी बिघडून त्यांचा मृत्यू झाला, असे आरोग्य विभागाने कळविले.
अधिक पडताळणीकरीता त्यांचे नमुने आरटीपीसीआर तपासणी करण्याकरीता घेण्यात आले होते. त्याचा अहवाल रात्री प्रशासनाकडे प्राप्त झाला. त्यात सदर रुग्णाचा मृत्यू कोरोना संसर्गामुळे झाल्याचे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले. मात्र तो रूग्ण चंद्रपूर जिल्ह्यातील असल्याने तसेच बाधितही जिल्हयाबाहेर झाले असल्याने त्यांची नोंद चंद्रपूर जिल्ह्यात घेण्यात आली.
मृत रूग्णाची पत्नी यावेळी सोबत होती. तिचाही अहवाल आरटीपीसीआर तपासणीत सकारात्मक मिळाला आहे. मृत कोरोना बाधिताचा अंतिम विधी जिल्हा सामान्य रूग्णालयाकडून गडचिरोली येथे आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार करण्यात आला.
२९ कोरोनामुक्त, तर २८ नवीन रुग्णांची भर
जिल्ह्यात मंगळवारी २९ जण कोरोनामुक्त झाले. त्यामध्ये चामोर्शी येथील सर्वाधिक २१ जण आहेत. तसेच गडचिरोली येथील ६, सिरोंचा व आरमोरी येथील प्रत्येकी १ असे एकूण २९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. २८ नवीन कोरोना बाधितांमध्ये गडचिरोली येथील १४ जण आहेत. त्यात एका गरोदर महिलेसह, सावली तालुक्यातील २, गडचिरोली शहरातील ११ रूग्णांचा समावेश आहे. आरमोरी येथील दोघा पॉजिटिव्हमध्ये १ आरोग्य कर्मचारी व १ कोरोनाबाधिताच्या संपर्कातील रुग्ण आहे.
देसाईगंज येथील ५ नवीन रुग्णांमध्ये बाधितांच्या संपर्कातील २ जण, मागील १० दिवसात लक्षणे आढळल्यानंतर सर्वेक्षणात आढळून आलेले ३ जण, कोरची येथील ३ प्रवासी, तसेच मुलचेरा येथील १ आरोग्य कर्मचारी व १ प्रवासी बधित आढळून आले आहेत. अहेरी येथेही १ प्रवासी बाधित आढळून आला. तर चामोर्शी येथे रूग्णाच्या संपर्कातील एक जण बाधित आढळला. असे २८ नवीन कोरोनाबाधित मंगळवारी आढळले. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण १०८३ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.