Coronavirus: निवडणुकीला स्थगिती; पण आचारसंहितेचे सावट कायम?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 06:07 PM2020-03-18T18:07:27+5:302020-03-18T18:10:19+5:30
प्रशासन संभ्रमात; आयोगाकडे मागितले मार्गदर्शन
गडचिरोली: कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीला अखेर राज्य निवडणूक आयोगाने स्थगिती दिली. पण नव्याने ही प्रक्रिया सुरू होईपर्यंत निवडणुकीची आचारसंहिता उठवण्यासंदर्भात कोणतेही स्पष्ट निर्देश नसल्यामुळे प्रशासकीय यंत्रणा संभ्रमात पडली आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने आयोगाकडे मार्गदर्शन मागितले आहे.
राज्यातील १९ जिल्ह्यांमधील १५७० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी येत्या ३१ मार्च रोजी मतदान होणार होते. पण प्रचाराची रणधुमाळी, मतदान आणि मतमोजणीसाठी होणारी संभाव्य गर्दी टाळण्यासाठी सदर निवडणूक प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत स्थगित ठेवण्याचा आदेश दि.१७ ला निवडणूक आयोगाने संबंधित जिल्हा प्रशासनाला दिला.
निवडणुकीच्या नियोजित कार्यक्रमानुसार दि.१६ ही नामांकन दाखल करण्याची शेवटची मुदत होती. तोपर्यंतची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. पण नामांकनांची छाननी होऊन वैध-अवैध नामांकन ठरवणे, त्यानंतर निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेणे आणि प्रत्यक्ष मतदान व मतमोजणी हे महत्वाचे टप्पे बाकी आहेत.
पुन्हा नामांकन भरण्याची गरज नाही
कोरोनाचे सावट कमी झाल्यानंतर ज्यावेळी निवडणुकीची पुढील प्रक्रिया सुरू होईल त्यावेळी उमेदवारांना नव्याने नामांकन दाखल करण्याची गरज पडणार नाही, असे गडचिरोलीचे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी स्पष्ट केले. याचा अर्थ संपूर्ण निवडणूक प्रक्रिया नव्याने होणार नसून ज्या टप्प्यावर प्रक्रिया थांबविली तेथून ती पुढे सुरू होणार आहे.
निवडणुकीच्या पुढील प्रक्रियेला स्थगिती देताना आयोगाने आचारसंहिता उठवायची की ठेवायची, याबाबत स्पष्ट निर्देश दिलेले नाही. निवडणूक आयोगाला यासंदर्भात पत्र देऊन मार्गदर्शन मागविले आहे. अद्याप आयोगाकडून त्याबाबतचे मार्गदर्शन मिळालेले नाही.
- दीपक सिंगला, जिल्हाधिकारी, गडचिरोली