CoronaVirus News: पप्पा, लवकर घरी परत या...! लेकीची आर्त साद; १७ दिवसांच्या लढ्यानंतर वडिलांची कोरोनावर मात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 12:06 AM2021-05-13T00:06:47+5:302021-05-13T00:07:06+5:30

CoronaVirus News: सीटी स्कोअर १८, ऑक्सिजन ७० असताना १७ दिवसांचा यशस्वी लढा

CoronaVirus News man recovred from corona in 17 days after oxygen level goes down to 70 | CoronaVirus News: पप्पा, लवकर घरी परत या...! लेकीची आर्त साद; १७ दिवसांच्या लढ्यानंतर वडिलांची कोरोनावर मात

CoronaVirus News: पप्पा, लवकर घरी परत या...! लेकीची आर्त साद; १७ दिवसांच्या लढ्यानंतर वडिलांची कोरोनावर मात

Next

- महेंद्र रामटेके

आरमोरी : ‘पप्पा, तुम्हाला काही होणार नाही, तुम्ही लवकर घरी परत या... मी तुमची वाट बघत आहे!’ सर्व परिस्थिती विपरीत दिसत असतानाही मुलीची ती आर्त हाक त्यांना जगण्याची नवी उमेद देत होती. आपल्याला जगायचे आहे, निदान कुटुंबासाठी तरी आपण जगलोच पाहिजे, असा ठाम निश्चय त्यांनी मनाशी केला आणि तब्बल १७ दिवस कोरोनाशी लढा देऊन विजयी मुद्रेने ते घरी परतले.

ही कहाणी आहे आरमोरी तालुक्यातील ठाणेगावच्या देवानंद बोरकर यांची. बोरकर यांना सुरुवातीला साधा सर्दी व ताप आला होता. त्यांनी गोळ्या घेऊन प्राथमिक उपचार केले. मात्र, प्रकृतीत सुधारणा झाली नाही. ब्रह्मपुरी येथे रुग्णालयात त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. तेथील खासगी रुग्णालयात भरती झाले. परंतु दुसऱ्या दिवसापासून श्वसनाचा त्रास वाढू लागला. ऑक्सिजन लेवल कमी होऊ लागली.

कोविड रुग्णालयाच्या डॉक्टरला माजी आमदार पुत्राकडून मारहाण; व्हिडीओ व्हायरल

डॉक्टरांना शाश्वती वाटत नसल्याने त्यांनी गडचिरोली किंवा नागपूरला उपचारासाठी घेऊन जाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे ब्रह्मपुरी येथून बोरकर यांना गडचिरोली येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. तोपर्यंत त्यांचा सिटी स्कोअर वाढून १८ वर तर ऑक्सिजन लेवल ७० वर आली होती.  नागपुरात बेड उपलब्ध नसल्याने भंडारा येथे विचारणा केली, पण बोरकर यांची स्थिती पाहून डॉक्टरांनी ९५ टक्के हमी नसल्याचे सांगत भरती करून घेण्यास नकार दिला. केवळ कुटुंबीयांच्या इच्छेखातर दवाखान्यात भरती करून घेतलेल्या बोरकर यांनी सकारात्मक विचार आणि मानसिक आधाराच्या जोरावर कोरोनावर मात केली.

धक्कादायक! रुग्णवाहिका आली, कर्मचारी उतरले अन् कोरोना बाधितांचे मृतदेह नदीत फेकले

पत्नीचा ५ टक्के आशावाद फळाला आला
भंडाऱ्यातील डॉक्टरांनी भरती करण्यास नकार दिल्यानंतरही बोरकर यांच्या पत्नीने खचून न जाता मोठ्या हिमतीने डॉक्टरांना केवळ ५ टक्के हमी घ्या आणि उपचार सुरू करा, ५ टक्के माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत, अशी विनवणी केली. त्यामुळे उपचार सुरू झाला. ९ दिवस व्हेंटिलेटर व ८ दिवस ऑक्सिजनवर अशा कठीण परिस्थितीत त्यांचा एक-एक दिवस मागे पडत होता. डोळ्यांसमोर मृत्यू बघत होतो, मात्र या परिस्थितीत पत्नीने दिलेली हिंम त, मुलीने फोनवरून वेळोवेळी घातलेली साद, मित्रमंडळींनी दिलेला धीर, विश्वास व आधार यांनी अँटिबॉडीचे काम केले आणि प्रबळ इच्छाशक्ती व आत्मबल जागृत होऊन सकारात्मकपणे जगण्याची नवी उमेद मिळाली. त्यामुळे कोरोनावर विजय मिळवू शकलो, असे देवानंद बोरकर सांगतात.

आप्तस्वकियांकडून हिंमत मिळणे गरजेचे
ऑक्सिजन पातळी खालावलेले अनेक रुग्ण केवळ भीतीने घाबरून मृत्यूच्या दाढेत पोहोचतात. अशा स्थितीत त्यांचे नातेवाईक, कुटुंबातील व मित्र परिवारातील लोकांनी त्यांच्यापासून दूर न जाता त्यांना हिंमत, धीर व आधार दिल्यास नक्कीच कोरोनावर यशस्वी मात करता येते, याचे उदाहरण म्हणजे ठाणेगाव येथील देवानंद बोरकर ठरले आहेत.

Web Title: CoronaVirus News man recovred from corona in 17 days after oxygen level goes down to 70

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.