CoronaVirus News: बेजबाबदारपणाचा कळस; गडचिरोलीत पीपीई किट फेकली रस्त्याच्या कडेला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2020 05:54 PM2020-09-13T17:54:26+5:302020-09-13T17:54:57+5:30
CoronaVirus News: कोरोनाचा धोका वाढला असताना प्रशासनाचा बेजबाबदारपणा
- नितेश पाटील
कुरुड (गडचिरोली) : गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग दिवसागणिक वाढून मृत्यूही ओढवणे सुरू झाले असताना दुसरीकडे पीपीई किटची योग्य पद्धतीने विल्हेवाट न लावता ती बेवारस अवस्थेत रस्त्याच्या कडेला फेकून देण्याचा प्रकार 'लोकमत'च्या निदर्शनास आला. त्या बेजबाबदार व्यक्तीचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आव्हान आता आरोग्य आणि पोलीस विभागापुढे निर्माण झाले आहे.
देसाईगंज ते आरमोरी या मुख्य मार्गावरील कोंढाळा गावापासून काही अंतरावर आरमोरीच्या दिशेने जाताना रस्त्याच्या डाव्या बाजूला ती पीपीई किट रविवारी (दि.13) दुपारी पडलेली होती. रस्त्याने जाणारे लोक त्याकडे पाहात होते पण कोणीच त्याबाबतची माहिती प्रशासनाला दिली नाही. सदर प्रतिनिधीने याबाबत प्रभारी तहसीलदार दीपक गुट्टे यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी अतिशय शांतपणे उत्तर देत त्या किटची विल्हेवाट लावण्यासाठी ग्रामपंचायतला सूचना दिली जाईल असे उत्तर दिले.
कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करताना कोरोनाच्या विषाणूंची बाधा होऊ नये म्हणून डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना ही पीपीई किट दिली जाते. त्यामुळे त्या पीपीई किटवर कोरोनाचे विषाणू असण्याची डाट शक्यता आहे. अशावेळी त्या किटची योग्य पध्दतीने विल्हेवाट लावणे गरजेचे असताना ग्रामपंचायतीकडून (साध्या पद्धतीने) विल्हेवाट लावण्याची भाषा तहसीलदारसारख्या जबाबदार व्यक्तीने करणे आश्चर्यकारक आहे.
गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयासह आरमोरी आणि देसाईगंज येथे असलेल्या कोविड केअर सेंटर मध्ये अशा किटचा वापर केला जातो. त्यामुळे ही किट नेमकी कोणी फेकली त्याचाही शोध घेणे गरजेचे असताना देसाईगंज तालुका प्रशासन मात्र त्याबाबत फारसे उत्सुक नसल्याचे दिसून आले. जिल्ह्यात कोरोनाचा सामाजिक संसर्ग सुरू झाला असताना प्रशासन कोरोना रोखण्याबाबत खरंच गंभीर आहे का? असा प्रश्न या घटनेमुळे निर्माण झाला आहे.