पावसाने नाल्यावरील पूल तुटल्याने महामंडळाची बससेवा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 12:27 AM2019-08-18T00:27:09+5:302019-08-18T00:27:56+5:30
जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात एटापल्ली तालुक्यासह अहेरी उपविभागात मुसळधार पाऊस बरसला. या पावसाने अनेक मार्ग व मार्गावरील पुलाची दुरवस्था झाली आहे. एटापल्ली-जारावंडी मार्गावरील कांदळी नाल्यावरील पूल तुटल्याने सदर मार्गावरील राज्य परिवहन महामंडळाची बससेवा बंद करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात एटापल्ली तालुक्यासह अहेरी उपविभागात मुसळधार पाऊस बरसला. या पावसाने अनेक मार्ग व मार्गावरील पुलाची दुरवस्था झाली आहे. एटापल्ली-जारावंडी मार्गावरील कांदळी नाल्यावरील पूल तुटल्याने सदर मार्गावरील राज्य परिवहन महामंडळाची बससेवा बंद करण्यात आली आहे.
एटापल्ली तालुका मुख्यालयापासून जारावंडीचे अंतर ५५ किमी आहे. एटापल्ली-जारावंडी मार्गावरील डांबरीकरण उखडून अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहे. मार्गाच्या दुरवस्थेमुळे सदर मार्गावरील बससेवा बंद करण्यात आली होती. सदर मार्गाचे नुतनीकरण करण्यात यावे, अशी मागणी या भागातील नागरिकांची गेल्या अनेक दिवसांपासूनची आहे. मात्र शासनाचे या मागणीकडे दुर्लक्ष झाले आहे.
यावर्षी कसनसूर ते जारावंडीपर्यंत काही मार्गाचे नुतनीकरण करण्यात आले. मार्गाच्या दुरूस्तीनंतर बंद असलेली बससेवा पुन्हा सुरू करण्यात आली. सदर मार्गावर अहेरी ते एटापल्ली-जारावंडी मार्गे गडचिरोली अशा दररोज दोन बसफेºया सुरू होत्या. तसेच गडचिरोली-कसनसूर ही बसफेरी सुरू होती. सदर बस कसनसूर येथे मुक्कामी असायचे. परंतु चार दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने सदर मार्गावरील कांदळी नाल्यावरील पूल तुटला. त्यामुळे सदर मार्गावरील बससेवा बंद करण्यात आली आहे.
एटापल्ली तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने अनेक डांबरी व खडीकरण रस्त्याची वाट लागली आहे. बुजविलेले खड्डे पुन्हा जैसे थे झाले आहेत. अनेक ठिकाणच्या छोट्या पुलानजीकची माती वाहून गेली आहे. एकूणच आवागमनाची मोठी समस्या निर्माण झाली आहे.