पशुखाद्याचा खर्च वाढला, मात्र दुधाच्या किमती कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:26 AM2021-06-25T04:26:09+5:302021-06-25T04:26:09+5:30
सध्या कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव प्रत्येक व्यवसायावर दिसून येत आहे. कोरोनाच्या कालखंडापासून ते आजपर्यंत जिल्ह्यात दुधाची मागणी वाढली आहे. ...
सध्या कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव प्रत्येक व्यवसायावर दिसून येत आहे. कोरोनाच्या कालखंडापासून ते आजपर्यंत जिल्ह्यात दुधाची मागणी वाढली आहे. अनेकजण आरोग्याच्या दृष्टीने रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आहारामध्ये दुधाचा वापर करीत आहेत. सध्या हाॅटेल, चहा, पानठेले सुरू झाले असल्याने दुधाच्या पदार्थांची मागणीही वाढली आहे. पाॅकेटने विकणाऱ्या दुधाच्या किमती वाढल्या आहेत. मात्र ग्रामीण भागातून विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांच्या दुधाच्या किमतीत वाढ झाली नाही.
तालुक्यात मुरखळा, रामाळा, खंडाळा, वाघोली, लखमापूर बोरी, अड्याळ, देवडी, वालसरा, भिवापूर, आमगाव, चाकलपेठ, फोकुर्डी या प्रमुख गावासह इतरही गावांतील शेतकरी दुधाळ जनावरे पाळत असतात. यासाठी जनावरांना पशुखाद्य खुराक म्हणून दिले जाते. अलीकडे पशुखाद्य व गुराखी राखण यात वाढ होत चालली आहे.
तालुक्यातील शेतकरी दररोज ८ ते १० किमी अंतर कापून शहरात दुधाची भटकंती करीत दूध विक्री करीत असतात. पावसाळ्यात अनेक संकटाचा सामना करीत ग्राहकांना दूध नेऊन द्यावे लागत असते. या सगळ्या बाबींचा विचार केला असता दुधाला प्रचंड मागणी असतानाही दर पाहिजे त्या प्रमाणात नाहीत. त्यामुळे दुधाळ जनावरे पाळणे अवघड जात आहेत. दुधाळ जनावरांच्या किमती लाखाच्या घरात पोहचल्या आहेत. शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दुधाच्या दरात वाढ करावी, अशी मागणी दूध उत्पादक शेतकरी नरेंद्र सोमनकर यांनी केली आहे.