नगर परिषदेचा खर्च अमर्याद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 12:15 AM2017-11-08T00:15:25+5:302017-11-08T00:15:36+5:30
गडचिरोली नगर परिषदेला आस्थापना खर्च करण्याची मर्यादा एकूण प्राप्त उत्पन्नाच्या ५५ टक्के एवढी असताना सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात नगर परिषदेने सुमारे ८१.७० टक्के एवढा खर्च केला आहे.
दिगांबर जवादे।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली नगर परिषदेला आस्थापना खर्च करण्याची मर्यादा एकूण प्राप्त उत्पन्नाच्या ५५ टक्के एवढी असताना सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात नगर परिषदेने सुमारे ८१.७० टक्के एवढा खर्च केला आहे. मागील तीन वर्षांपासून मर्यादेच्या पलिकडे खर्च गेला असल्याने नगर परिषद संवर्गाची पदे भरण्यास अडचण निर्माण झाली आहे.
नगर विकास विभागाने नगर परिषदेच्या दर्जानुसार आस्थापना खर्च करण्याची मर्यादा घालून दिली आहे. अ दर्जाच्या नगर परिषदेसाठी आस्थापना खर्च ५० टक्के, ब दर्जाच्या नगर परिषदेसाठी ५५ टक्के व क दर्जाच्या नगर परिषदेसाठी ६० टक्के एवढी मर्यादा घालून देण्यात आली आहे. या मर्यादेचे उल्लंघन करणाºया नगर परिषदेला नगर परिषद संवर्गाचे पदे भरण्यास प्रतिबंध घातला जातो. त्यामुळे अपवाद वगळता सर्वच नगर परिषदा मर्यादेच्या पलिकडे खर्च होणार नाही. याची विशेष खबरदारी घेतात. मात्र गडचिरोली नगर परिषदेत अनागोंदी कारभार सुरू असून याचा परिणाम आस्थापना खर्चावर दिसून येत आहे.
२०१६-१७ या आर्थिक वर्षात गडचिरोली नगर परिषदेला मालमत्ता करातून २ कोटी ५९ लाख ९५ हजार, जाहिरात करातून ६० हजार, बाजार उत्पन्नातून ८ लाख २३ हजार, शाळा इमारतींच्या भाड्याच्या माध्यमातून ७ लाख ८२ हजार, जोडणी शुल्कातून २१ हजार, विकास शुल्कातून २८ लाख १३ हजार, जन्म, मृत्यूंच्या दाखल्यांपासून ५ लाख २६ हजार, नोटीस फी, परवाने फी व दंडाच्या माध्यमातून ७६ हजार, दवाखाना, ग्रंथालय, कोंडवाडा, कत्तलखाना, समाज मंदिर, नाट्यगृहापासून १ लाख ३८ हजार, अग्नीशमन पाणी टँकर शुल्क, रूग्णवाहिका शुल्काच्या माध्यमातून ३ लाख २४ हजार, असे एकूण नगर परिषदेचे स्वत:चे उत्पन्न ३ कोटी १६ लाख ४५ हजार रूपयांचे आहे. शासनाकडून नगर पालिकेला सहायक अनुदान म्हणून ३ कोटी ४९ लाख १६ हजार रूपयांचे अनुदान मिळाले आहे. पोर्ट अनुदानातून २ लाख ३ हजार, गौणखनिजातून एक लाख तसेच शिक्षण व दवाखान्याच्या कर्मचाºयांच्या वेतनासाठी ३ कोटी ५० लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. अनुदाने व नगर परिषदेचे स्वत:चे उत्पन्न मिळून एकूण वार्षिक उत्पन्न १० कोटी १८ लाख एवढे आहे. याच वर्षात नगर पालिकेला पाणी पुरवठ्यातून ९४ लाख रूपये उत्पन्न मिळाले आहे. तर पाणी पुरवठ्यावरील एकूण खर्च १ कोटी २२ लाख एवढा आहे. म्हणजेच पाणी पुरवठा योजनेवर उत्पन्नापेक्षा २७ लाख ७३ हजार रूपये अधिकचा खर्च होत आहे.
नगर पालिकेच्या स्थायी आस्थापनेवर ६ कोटी २४ लाख ६५ हजार, अस्थायी आस्थापनेवर २३ लाख ८८ हजार, रोजंदारी व मानधन तत्वावरील कर्मचाºयांवर ५ लाख २३ हजार, कर्मचाºयांच्या दिलेल्या आर्थिक लाभावर ४ लाख २१ हजार, निवृत्त कर्मचाºयांच्या वेतनावर १ कोटी ५१ लाख ६१ हजार असे एकूण ८ कोटी ९ लाख ५८ हजार रूपये खर्च झाले आहेत.
नगर विकास विभागाने आस्थापना खर्च काढावयाचे जे सूत्र ठरवून दिले आहे. त्यानुसार २०१६-१७ या आर्थिक वर्षातील गडचिरोली नगर परिषदेचा आस्थापना खर्च ८१.७० टक्के एवढा आहे. जो ग्राम विकास विभागाने घालून दिलेल्या ५५ टक्के मर्यादेच्या पलिकडे आहे. याकडे गडचिरोली नगर परिषद पदाधिकारी व अधिकारी यांनी लक्ष घालून आस्थापना खर्च मर्यादेत राहिल याबाबत नियोजन करणे गरजेचे आहे. अन्यथा नगर परिषदेचा प्रशासकीय डोलारा खचण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पाणी पुरवठ्याचा खर्च उत्पन्नापेक्षा जास्त
गडचिरोली शहराला नगर परिषदेच्या मार्फत पाणी पुरवठा केला जातो. पाणी पुरवठ्यातून नगर परिषदेला २०१६-१७ या आर्थिक वर्षात वार्षिक ९४ लाख ९६ हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. मात्र या वर्षातील खर्च सुमारे १ कोटी २२ लाख ६९ हजार रूपये एवढा आहे. म्हणजेच पाणी पुरवठा योजना २७ लाख ७३ हजार रूपयांनी तोट्यात असल्याचे दिसून येते.