चामोर्शी तालुक्यात कापूस वेचणीचा दर १० रुपयांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 02:42 PM2024-11-06T14:42:26+5:302024-11-06T14:43:44+5:30

विद्यार्थीही करताहेत वेचणी : मजुरांच्या शोधात भटकंती

Cotton picking rate in Chamorshi taluka at Rs 10 | चामोर्शी तालुक्यात कापूस वेचणीचा दर १० रुपयांवर

Cotton picking rate in Chamorshi taluka at Rs 10

लोकमत न्यूज नेटवर्क 
चामोर्शी :
सध्या शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात कापूस फुटला असून, तो वेचण्यासाठी मजूर मिळत नसल्याने घरादारातील आबालवृद्धांसह बाळगोपालांनाही स्वतःच्या शेतात कापसाची वेचणी करावी लागत आहे. जवळपास शेतकऱ्यांची दिवाळी शेतात काम करण्यातच गेली आहे. दिवाळीच्या सुट्यांचा आनंद घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या कामातून सुटका मिळत नसल्याने नको ही सुटी अशी म्हणण्याची वेळ यावर्षी विद्यार्थ्यांवर सध्या आली आहे. पाऊस लांबल्यामुळे कामाची एकच धूम जिकडेतिकडे पहावयास मिळत असून, मजुराची टंचाई शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी सध्या ठरत असल्यामुळे कॉटन बेल्टची दैना झाली आहे.


चामोर्शी तालुक्यात धान व कापूस ही मुख्य पिके आहेत. ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी सुरू राहिल्यामुळे फुटलेला कापूस ओला झाला व त्याला कोंबही फुटले. अशा परिस्थितीत कापूस वेचणी थांबली. सोबतच धान कापणीचा हंगामही सुरू झाला आहे. त्यामुळे मजुरांची टंचाई भासत असतानाचा दिवाळीचा सण आल्याने मजूर मिळणे दुरापास्त झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचा पहिला वेचापण होऊ शकला नाही. सध्या वेचणीचे दर १० रुपये प्रतिकिलो असून, ऑटोची मजुरी व इतर खर्च मिळून १५ रुपये प्रतिकिलो खर्च येत आहे. 


प्रत्येक गावांत धान कापणीचीही लगबग 
दिवाळीनंतर आता धान कापणीलाही सुरुवात झाली आहे. मजूरवर्ग धान कापणी व कापूस वेचणीच्या कामाता दुभागला आहे. त्यामुळे दोन्ही कामांसाठी पुरेसे मजूर मिळणे बंद झाले आहे. परिणामी शेतकऱ्यांनाच शेतीची कामे करावी लागत आहे. 


दिवाळीची सुटी शेतीकामातच 
सध्या दिवाळीचा सण उत्साहात साजरा करण्याचे दिवस असताना सुटीच्या दिवसांत विद्यार्थ्यांनाही पाठीवर ओटी बांधून कापूस वेचणी करावी लागत आहे. त्याशिवाय आता पर्याय शिल्लक नाही.


पावसामुळे लांबला हंगाम 
पंधरा दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे कापूस वेचणीचा हंगाम लांबला आहे. आता धान कापणी व कापूस वेचणी दोन्ही कामे एकाचवेळी आल्याने मजुरांचे प्रचंड टंचाई ग्रामीण भागामध्ये दिसून येत आहे. मजुरांना अधिकची किंमत मोजावी लागत आहे. तरीही मजूर मिळत नाही.


"सध्या धान कापणी व कापूस पिकाची वेचणी दोन्ही कामांची लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे मजूर मिळणे कठीण झाले आहे. कापूस वेचणीचा दर १० रुपये प्रतिकिलोवर पोहोचला आहे. उत्पादन खर्च वाढल्यामुळे शेती धोक्यात आली आहे." 
- प्रमोद दुधबळे, शेतकरी

Web Title: Cotton picking rate in Chamorshi taluka at Rs 10

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.