नक्षल्यांशी धाडसाने मुकाबला: गडचिरोली पोलिसांचे 'शौर्य', १९ जणांना पदक जाहीर
By संजय तिपाले | Published: January 25, 2024 03:04 PM2024-01-25T15:04:15+5:302024-01-25T15:05:03+5:30
एका अधिकाऱ्यास राष्ट्रपती पदक...
गडचिरोली : दुर्गम, अतिदुर्गम भागात नक्षल्यांशी धाडसाने मुकाबला करत सेवा बजावणाऱ्या जिल्ह्यातील १८ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना शौर्य तर एका अधिकाऱ्यास राष्ट्रपती पदक मिळाले. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशाच्या गृहमंत्रालयाने जाहीर केलेल्या यादीत जिल्ह्यातील १९ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्थान मिळवल्याने ही मोठी अभिमानाची बाब मानली जात आहे.
पोलिस दलात उत्कृष्ट, धाडसी व गुणवत्तापूर्ण सेवा देणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पदक देऊन गौरविले जाते. प्रजासत्ताकदिनापूर्वी हे पदक घोषित केले जातात. त्यानुसार २५ जानेवारीला केंद्रीय मंत्रालयाने ही यादी जाहीर केली. जिल्ह्यात सेवा बजावलेले तत्कालीन अपर अधीक्षक सोमय मुंडे, उपअधीक्षक संकेत गोसावी यांच्यासह पोलिस नाईक कमलेश नैताम, शंकर बाचलवार, मुन्शी मडावी, देवेंद्र आत्राम, संजय वचामी, विनोद मडावी, गुरुदेव मेश्राम, माधव मडावी, जीवन नरोटे, हवालदार मोहन उसेंडी, कॉन्स्टेबल हिराजी नेवारे, ज्योतिराम वेलादी, सूरज चुधरी, विजय वडेट्टवार, कैलास गेडाम यांना शौर्य पदक जाहीर झाले असून सहायक उपनिरीक्षक देवाजी कोवासे यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. प्रजासत्ताकदिनी या सर्वांचा मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमात गौरव केला जाणार असून राष्ट्रपतींच्या हस्तेही लवकरच सन्मान केला जाणार आहे.
गतवर्षी ६२ जणांची पदकाला गवसणी
दरम्यान, गतवर्षी जिल्हा पोलिस दलातील ६२ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदक जाहीर झाले होते. यंदाही गडचिरोली पोलिस दलाने गौरवशाली परंपरा कायम ठेवत पदकांमध्ये दबदबा राखला. पदकप्राप्त पोलिस अधिकारी व अंमलदारांचे उपमहानिरीक्षक संदीप पाटील, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर अधीक्षक यतीश देशमुख, बी. रमेश व कुमार चिंता यांनी स्वागत केले आहे.