कुठे गेल्या गाई, कोणी खाल्ली मलाई? भामरागडमध्ये आदिवासी लाभार्थ्यांची फसवणूक, फौजदारीसाठी उपोषण

By संजय तिपाले | Published: September 11, 2023 02:54 PM2023-09-11T14:54:34+5:302023-09-11T14:56:59+5:30

गायवाटप घोटाळा : दोषींवर गुन्हा नोंदविण्याची मागणी

Cow allocation scam: Fraud of tribal beneficiaries in Bhamragarh, hunger strike for justice | कुठे गेल्या गाई, कोणी खाल्ली मलाई? भामरागडमध्ये आदिवासी लाभार्थ्यांची फसवणूक, फौजदारीसाठी उपोषण

कुठे गेल्या गाई, कोणी खाल्ली मलाई? भामरागडमध्ये आदिवासी लाभार्थ्यांची फसवणूक, फौजदारीसाठी उपोषण

googlenewsNext

गडचिरोली : दुधाळ गाय वाटप योजनेत आदिवासींना आलेले अनुदान दुसऱ्या खात्यात वळवून फसवणूक केल्याचा आरोप करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ११ सप्टेंबरला अखिल भारतीय सरपंच परिषदेने बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आले. कुठे गेल्या गाई, कोणी खाल्ली मलाई असा सवाल करुन आंदोलनकर्त्यांनी दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर ॲट्रॉसिटीनुसार गुन्हा नोंदविण्याची मागणी केली.

आदिवासींना आर्थिक स्थैर्य मिळावे, यासाठी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत विविध योजना राबविण्यात येतात. भामरागड या अतिदुर्गम तालुक्यात प्रकल्प कार्यालयामार्फत २० लाभार्थ्यांना दुधाळ गायींसाठी प्रत्येकी एक लाख रुपये खात्यात जमा करण्यात आले. पैसे काढल्यावर गायी देण्यात येतील, असे सांगण्यात आले व त्यांच्या स्वाक्षऱ्या घेऊन पैसे परस्पर दुसऱ्या खात्यात वळती केले. त्यानंतर लाभार्थ्यांना ना गायी दिल्या ना अनुदान दिले, यातून त्यांची फसवणूक झाल्याचा दावा सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष योगाजी कुडवे यांनी केला आहे.

या प्रकरणात प्रकल्प कार्यालयातील अधिकारी - कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचा कुडवे यांचा आरोप आहे.२०२० ते २०२३ या दरम्यान राबविलेल्या विविध योजनांची चौकशी करुन अधिकाऱ्यांची एसआयटी व एसीबीमार्फत चौकशी करावी, दोषींवर ॲट्रॉसिटीनुसार कारवाई करावी, या मागणीसाठी योगाजी कुडवे, अरविंद देशमुख, राजू गडपायले, धनंजय डोईजड, मधुकर रेवाडे यांनी धरणे आंदोलन सुरु केले आहे.

 चौकशीस टोलवाटोलवी, अधिकाऱ्यांची पाठराखण

भामरागड येथील आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालयांतर्गत गाय वाटप योजनेबाबत योगाजी कुडवे यांनी तीन महिन्यांपूर्वीच तक्रार केली होती, पण अद्याप चौकशी झाली नाही. त्यामुळे या अधिकाऱ्यांची पाठराखण नेमकं करतयं कोण, असा सवाल कुडवे यांनी उपस्थित केला आहे.

Web Title: Cow allocation scam: Fraud of tribal beneficiaries in Bhamragarh, hunger strike for justice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.