शिकारीसाठी लावलेल्या फासात अडकली गाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 10:51 PM2018-05-21T22:51:19+5:302018-05-21T22:51:43+5:30
आलापल्ली येथील रोपवाटीकेच्या बाजूला शिकाºयांनी लावलेल्या फासामध्ये गाय अडकून पडली असल्याचे दस्तुरखुद्द विभागीय वनाधिकारी (दक्षता) एस. एस. बिलोलीकर यांना लक्षात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
आलापल्ली : आलापल्ली येथील रोपवाटीकेच्या बाजूला शिकाऱ्यांनी लावलेल्या फासामध्ये गाय अडकून पडली असल्याचे दस्तुरखुद्द विभागीय वनाधिकारी (दक्षता) एस. एस. बिलोलीकर यांना लक्षात आले. सदर गायीची सुटका करण्यात आली. यावरून आलापल्ली भागात मोठ्या प्रमाणात वन्यजीवांची शिकार होत असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे.
विभागीय वनाधिकारी एस. एस. बिलोलीकर हे आलापल्ली येथे प्रशासकीय कामासाठी आले होते. वन्यप्रेमी रामू मादेशी व इतरांनी बिलोलीकर यांची भेट घेऊन जंगलात होत असलेल्या शिकारीबाबतची माहिती दिली. त्यानुसार बिलोलीकर यांच्यासह वन्यप्रेमी व वन कर्मचारी साग रोपवाटीकेच्या बाजूला एक गाय फासामध्ये अडकून असल्याचे आढळून आले. गाईची मुक्तता केल्यानंतर पंचनामा करण्यात आला. आजुबाजूच्या परिसरातही पाहणी करून फासे काढण्यात आले.
फासे आढळल्यानंतर वन्यप्रेमी व वन परिक्षेत्राधिकारी यांच्यामध्ये बाचाबाची झाली. आपल्याला बदनाम करण्यासाठीच या ठिकाणी फासे लावले असावेत, असा आरोप वन परिक्षेत्राधिकारी किरण पाटील यांनी केला. बिलोलीकर यांच्या मध्यस्थीनंतर वाद मिटविण्यात आला. भेटीदरम्यान उपविभागीय वनाधिकारी एस. एस. बिलोलीकर यांच्यासोबत वन परिक्षेत्राधिकारी के. डी. पाटील, फिरत्या पथकाचे वन परिक्षेत्राधिकारी सत्यवान आत्राम, रामू मादेशी, गणेश सडमेक, सुरेश आलाम, किशोर सडमेक, बाळू मडावी, पी. एन. अलोणे, चौधरी, कुडावले, गेडाम आदी हजर होते.
झुडूपांचा आधार घेऊन फासे लावली जातात. त्यामुळे ती सहजासहजी नजरेस पडत नाही. आलापल्ली येथे फासे आढळल्यानंतर या संपूर्ण परिसरात फास्यांचा शोध घेण्याचे तसेच गस्त वाढविण्याचे निर्देश बिलोलीकर यांनी वन परिक्षेत्राधिकारी यांना दिले.