नागरिक पितात ओढ्याचे पाणी
By admin | Published: October 3, 2016 02:16 AM2016-10-03T02:16:59+5:302016-10-03T02:16:59+5:30
धानोरा तालुक्यातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुरूमगाव परिसरातील
तीन महिने उलटले : कटेझरी येथील चार हातपंप बंद
मुरूमगाव : धानोरा तालुक्यातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुरूमगाव परिसरातील कटेझरी नं. २ येथील एकूण ५ पैकी ४ हातपंप मागील तीन महिन्यांपासून बंद अवस्थेत असल्याने गावातील नागरिकांना १ किमीची पायपीट करून लगतच्या ओढ्यातील दूषित पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता बळावली आहे.
गावातील जलस्त्रोत सुस्थितीत आहेत की नाही, याची स्थानिक प्रशासनाने दखल घ्यायची असते. जलस्त्रोत बंद अथवा नादुरूस्त असल्यास वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा स्थानिक प्रशासन करीत असते. याचाच संदर्भ कटेझरी ग्राम पंचायतीने घेऊन पंचायत समिती व जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदन सादर करून गावातील हातपंपाची दुरूस्ती करण्याची मागणी केली होती. परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दखल घेण्यात आली नाही. मुरूमगाव परिसरातही यंदा भरपूर पर्जन्यवृष्टी झाल्याने ओढ्यातून नेहमी गढूळ पाणी वाहत असते. तरीसुद्धा येथील महिलांना १ किमीची पायपीट करून पिण्याचे पाणी आणावे लागत आहे. (वार्ताहर)
ग्रा. पं. च्या मागणीची दखल नाही
गावातील ५ पैकी ४ बंद असलेल्या हातपंपाची दुरूस्ती करण्याबाबत स्थानिक ग्राम पंचायत प्रशासनाच्या वतीने पंचायत समिती व जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून समस्येकडे लक्ष वेधले होते. परंतु या घटनेला तीन महिन्याचा कालावधी उलटूनही प्रशासनाने लक्ष दिले नाही. त्यामुळे येथील नागरिकांना अद्यापही ओढ्यातील पाणी आणून प्यावे लागत आहे.