गरजवंत विद्यार्थ्यांसाठी चाईल्ड केअर फंड निर्माण करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:42 AM2021-09-23T04:42:17+5:302021-09-23T04:42:17+5:30
येथील प्रेस क्लब भवनात प्रेस क्लबच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी आपला राष्ट्रीय पुरस्कारापर्यंतचा विद्द्यादानाचा प्रवास उलगडला. या प्रवासात विद्यार्थ्यांना ...
येथील प्रेस क्लब भवनात प्रेस क्लबच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी आपला राष्ट्रीय पुरस्कारापर्यंतचा विद्द्यादानाचा प्रवास उलगडला. या प्रवासात विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लावण्यासाठी केलेले विविध प्रयोग कसे यशस्वी झाले, याचे रहस्यही त्यांनी उलगडले.
१९९६ मध्ये सिरोंचा तालुक्यातील अतिदुर्गम झिंगानूर गावातील जिल्हा परिषद शाळेवर सर्वप्रथम ते रुजू झाले. जळगाव (खान्देश) येथून येऊन झिंगानूरसारख्या गावात ड्युटी करणे मोठे कसरतीचे काम होते. गावात जाण्यासाठी एकच बस होती. अनेक दिवसांपर्यंत वीज पुरवठाही खंडित राहत असे. पण मनात नकारात्मकता न येऊ देता माडिया भाषा शिकली. अभिनयाची आवड असल्याने मुलांना माडियातून, अनुरूप हावभावासह शिकविण्याची स्टाईल आवडली आणि मुले जुळत गेली. त्यामुळे विद्यार्थी संख्या १२५ वरून ३०० वर गेली. त्यानंतर वेलगूर येथील शाळेत असताना शेख यांनी गुणवत्ता विकास कार्यक्रमात त्या शाळेला विभागात प्रथम आणले. विद्यार्थ्यांची बँक, कमवा-शिका, स्काऊट-गाईड युनिट आदी प्रयोगांमुळे भकास वाटणाऱ्या शाळा रमणीय होत गेल्याचे शेख यांनी सांगितले.
सध्या कार्यरत असलेल्या आसरअल्लीच्या शाळेत कॉम्प्युटरपासून विविध आधुनिक सोयी-सुविधा विद्यार्थ्यांना देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. वृत्तपत्रांचे महत्त्व आणि कार्यपद्धती कळण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी ‘किड्स समाचार’ हे हस्तलिखित साप्ताहिकही ते विद्यार्थ्यांकडून बनवून घेतात.
(बॉक्स)
पालक बनून विद्यार्थ्यांशी मनाने जुळा
नैसर्गिक वातावरणात खूप चांगले शिक्षण देता येते. विद्यार्थ्यांमध्ये कमतरता नसते, फक्त त्यांना तसे घडविता आले पाहिजे. त्यांचे पालक बनून मनाने त्यांच्याशी जुळल्यास हे शक्य होते. प्राथमिक वर्गातील मुलांचे शिक्षण गंभीरपणे नसावे. ‘ॲक्टिव्हिटिबेस लर्निंग’ ही माझी कल्पना असून त्यामुळेच मुले जुळत असल्याचे ते म्हणाले.
(बॉक्स)
- शिक्षकांकडील अतिरिक्त कामाचा बोजा कमी व्हावा
प्रशासनाकडून शिक्षक आणि सरकारी शाळांना बऱ्यापैकी चांगल्या सुविधा मिळतात. पण शिक्षकांकडील शिक्षणेतर कामांचा बोजा कमी करणे गरजेचे आहे. शिकविण्याचे काम सोडून इतर कामे, अहवाल, प्रशिक्षण, सर्वेक्षण यात शिक्षक वर्ग जास्त गुंतून राहत आहे. यामुळे मूळ कामाकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत खुर्शिद शेख यांनी व्यक्त केली.