बंगाली गावांचा विकास आराखडा तयार करा
By admin | Published: January 7, 2017 01:26 AM2017-01-07T01:26:55+5:302017-01-07T01:26:55+5:30
बंगाली समाज अद्यापही मागासलेल्या स्थितीत आहे. या समाज बांधवांचे अनेक प्रश्न कायम आहेत.
अशोक नेते यांचे निर्देश : तुमडी गावात बंगाली भाषिक लोकांच्या समस्यांवर बैठक
घोट : बंगाली समाज अद्यापही मागासलेल्या स्थितीत आहे. या समाज बांधवांचे अनेक प्रश्न कायम आहेत. बंगाली समाजाच्या विविध प्रश्नांसंदर्भात आपण गांभिर्याने दखल घेतली असून विकासासाठी प्रयत्न सुरू आहे. बंगाली भाषिक गावांच्या विकासाचा कृती आराखडा तयार करा, असे निर्देश खासदार अशोक नेते यांनी दिले.
घोटनजीकच्या तुमडी येथील नरनारायण सेवाश्रमात पुनर्वसीत बंगाली गावाच्या विकासासाठी करावयाच्या नियोजन आराखड्याबाबत जिल्ह्यातील बंगाली भाषिक नागरिकांची बैठक शुक्रवारी पार पडली. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी मार्गदर्शक म्हणून आमदार डॉ. देवराव होळी होते. मंचावर निखील भारत उदवास्तू समितीचे अध्यक्ष दीपक हलदर, माजी जि.प. अध्यक्ष रवींद्र ओल्लालवार, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील वरघंटे, तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, जि.प. सदस्य नामदेव सोनटक्के, अशोक पोरेड्डीवार, विलास गण्यारपवार, पं.स. उपसभापती मंदा दुधबावरे, विवेकानंदपूरच्या सरपंच ममता बिश्वास, सुभाषग्रामचे सरपंच सतीश रॉय, प्रकाश दत्ता, बिधान वैद्य, सरपंच तपन सरकार, परिमल सरकार, निर्मल हलदर, निरंजन बाछाड आदी उपस्थित होते. याप्रसंगी समितीच्या वतीने खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
पुढे बोलताना खासदार अशोक नेते म्हणाले, वित्त नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून बंगाली गावाच्या सर्वांगिण विकासासाठी स्वतंत्र पॅकेज (निधी) उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू. बंगाली समाज बांधवांना महाराष्ट्र वगळता इतर राज्यात जातीचे प्रमाणपत्र दिले जात आहे. गडचिरोली जिल्ह्यातील बंगाली बांधवांना जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठीचा मुद्दा आपण लोकसभेत मांडू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. प्रास्ताविक दीपक हलदर, संचालन बिधान बेपारी यांनी केले तर आभार रमेश अधिकारी यांनी मानले. या कार्यक्रमाला चामोर्शी व मुलचेरा तालुक्यातील बंगाली बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)