क्रीडा क्षेत्रामध्ये जिल्ह्याची ओळख निर्माण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2016 02:29 AM2016-10-19T02:29:09+5:302016-10-19T02:29:09+5:30
क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा चांगले करिअर आहे. त्यामुळे पालक व शिक्षकांनी दैनंदिन अभ्याबरोबरच खेळांबद्दलही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रूची निर्माण करावी,
क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन : क्रीडाधिकाऱ्यांचे प्रतिपादन
गडचिरोली : क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा चांगले करिअर आहे. त्यामुळे पालक व शिक्षकांनी दैनंदिन अभ्याबरोबरच खेळांबद्दलही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रूची निर्माण करावी, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये गडचिरोली जिल्ह्याचा ठसा उमटवावा, असे प्रतिपादन जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रदीप शिंदे यांनी केले.
भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १८ आॅक्टोबर रोजी सकाळी ७.३० वाजता जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रदीप शिंदे यांच्या हस्ते क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना चंद्रदीप शिंदे बोलत होते. कार्यक्रमाला अतिरिक्त जिल्हाधिकारी महेश आव्हाड, संस्थेचे मार्गदर्शक ऋतुराज हलगेकर, प्राचार्य संजीव गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे मार्गदर्शन करताना चंद्रदीप शिंदे म्हणाले की, शरीर, मन सुदृढ ठेवण्यासाठी खेळाचे फार महत्त्व आहे. खेळामुळे विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक विकास होऊन त्यांच्यामध्ये नेतृत्वगुण, चिकाटी, जिद्द, सहनशिलता निर्माण होण्यास मदत होते. अतिरिक्त जिल्हाधिकारी महेश आव्हाड यांनी अभ्यासाबरोबरच खेळांकडेही लक्ष देण्याचे आवाहन केले.
संचालन प्रा. राकेश चडगुलवार, रहिम पटेल तर आभार संतोष कुळमेथे यांनी मानले. (नगर प्रतिनिधी)