भामरागडला भेट देतील, असे वातावरण तयार करा
By admin | Published: March 16, 2016 08:36 AM2016-03-16T08:36:08+5:302016-03-16T08:36:08+5:30
राज्यभरातील शिक्षक कुमठे बिटाला भेट देऊन तेथील शैक्षणिक वातावरण जाणून घेत आहेत. भामरागड तालुक्यातही
भामरागड : राज्यभरातील शिक्षक कुमठे बिटाला भेट देऊन तेथील शैक्षणिक वातावरण जाणून घेत आहेत. भामरागड तालुक्यातही असे शैक्षणिक वातावरण तयार करा, की किमान विदर्भातील शिक्षक भामरागड तालुक्यातील शाळांना भेटी देतील, असे प्रतिपादन राज्याचे शिक्षण आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर यांनी केले. दरम्यान भामरागड तालुक्यातील सर्वच १०५ शाळांमध्ये ज्ञानरचनावादाप्रमाणे अध्यापन करण्यासाठी तयारी केली जात असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
शिक्षण आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर यांनी भामरागड तालुक्यातील सर्वच १०५ शाळा दत्तक घेतल्या आहेत. या शाळांची चालू शैक्षणिक वर्षातील प्रगती जाणून घेण्यासाठी भामरागड येथे मंगळवारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीला शिक्षण आयुक्त कार्यलय पुणे येथील एस. एच. महाजन, सुभाष मोहीते, डायटचे प्राचार्य बी. जी. चौरे, माध्यमिक शिक्षणाधिकारी नानाजी आत्राम, प्राथमिक शिक्षणाधिकारी माणिक साखरे, निरंतर शिक्षणाधिकारी नीलेश पाटील, उपशिक्षणाधिकारी यू. एन. राऊत, भामरागड पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी फरेंद्र कुत्तीरकर, गटशिक्षणाधिकारी दडमारे, अहेरीचे गटशिक्षणाधिकारी विक्रम गिरे, जि. प. सदस्या लैजा चालुरकर, ग्यानकुमारी कौशी, भामरागड पंचायत समिती सभापती रंजना उईके यांच्यासह तालुक्यातील सर्व शिक्षक, केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी उपस्थित होते.
आढावा बैठकीदरम्यान ज्ञानरचनावादाप्रमाणे अध्यापन करण्यासाठी ३५ शाळांची रचना करण्याचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित शाळांमध्येही हे काम ८० ते ९० टक्क्यापर्यंत पूर्ण झाले आहे. आठ ते दहा दिवसांत संपूर्ण १०५ शाळांमध्ये ज्ञानरचनावादाप्रमाणे शिक्षण दिले जाईल, अशी माहिती देण्यात आली. लोकसहभागातून सद्य:स्थितीत एक शाळा डिजीटल झाली असून तालुक्यातील संपूर्ण शाळा डिजीटल करण्याचा मानस संवर्ग विकास अधिकारी यांनी व्यक्त केला आहे. साधन व्यक्ती चांगदेव सोरते यांनी शाळांनी केलेल्या गुणवत्तेचे सादर केले. जिल्हा समन्वयक नितेश बोरकर यांनी शाळांमध्ये झालेले बदल व पुढे करावयाची कामे याची माहिती सादर केली. कार्यशाळेदरम्यान मार्गदर्शन करताना डॉ. भापकर यांनी भामरागड तालुक्यातील परिस्थिती अतिशय वाईट आहे, हे जरी सत्य मान्य केले तरी ही परिस्थिती बदलविणे आपले कर्तव्य आहे, हे प्रत्येक शिक्षकाने लक्षात घेतले पाहिजे. १०० टक्के विद्यार्थी प्रगत करण्याबरोबरच एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहणार नाही, यासाठी संपूर्ण यंत्रणा काम करणे गरजेचे असल्याचे मार्गदर्शन केले. (तालुका प्रतिनिधी)