शेततळ्याच्या माध्यमातून सिंचन सुविधेची निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2020 05:00 AM2020-08-09T05:00:00+5:302020-08-09T05:00:58+5:30
शेतीसाठी जमिनीची सुपीकता, अत्याधुनिक कृषी साधने, बी-बियाणे, खते याबरोबरच पाण्याची उपलब्धता अत्यंत महत्वाची आहे. पावसाच्या पाण्यावर खरीप हंगामात वर्षातून एकच पीक घेता येते. मात्र शेतातल्या जमिनीवर पडलेल्या पावसाच्या पाण्याचे सुयोग्य नियोजन करून ते अडविल्यास पावसाळ्यानंतर सुद्धा रब्बी हंगामातील अनेक पिके शेतकऱ्यांना घेता येतात.
अतुल बुराडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
विसोरा : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत देसाईगंज तालुक्यात ^‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेअंतर्गत २०१६ ते २०२० या चार वर्षाच्या कालावधीत एकूण ६० शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. या संरक्षित सिंचन योजनेमुळे शेतकरी सुखावणार असून उत्पन्न वाढीसाठी त्याचा उपयोग होत आहे.
शेतीसाठी जमिनीची सुपीकता, अत्याधुनिक कृषी साधने, बी-बियाणे, खते याबरोबरच पाण्याची उपलब्धता अत्यंत महत्वाची आहे. पावसाच्या पाण्यावर खरीप हंगामात वर्षातून एकच पीक घेता येते. मात्र शेतातल्या जमिनीवर पडलेल्या पावसाच्या पाण्याचे सुयोग्य नियोजन करून ते अडविल्यास पावसाळ्यानंतर सुद्धा रब्बी हंगामातील अनेक पिके शेतकऱ्यांना घेता येतात. धानपिकाला अधिक पाणी लागते. तरीही जिल्ह्यातील शेतकरी जलसिंचनाच्या अत्याधुनिक अशा पद्धतीचा वापर न करता धानपिकाला भरमसाठ पाणी देतात. आवश्यक तेवढेच पाणी धानपिकाला देऊन जास्तीची पाणी शेतात जमा केल्यास तेच पाणी संकटकाळात वापरता येते. ही बाब ओळखून देसाईगंज तालुक्यातील शेतकऱ्यांनी मागील चार वर्षांत ६० शेततळे बांधून सिंचनाची सोय केली आहे.
राज्य शासनाने जलयुक्त शिवार योजनेत ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना अमलात आणली. शेतकऱ्यांनी शेततळे घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज केले होते. अर्ज केलेल्या शेतकऱ्यांच्या शेततळ्याच्या एकूण ६० कामांना मंजुरी मिळाली. योजनेअंतर्गत २०१६-१७ मध्ये १२, २०१७-१८ मध्ये ३, २०१८-१९ मध्ये सर्वाधिक २९ आणि २०१९-२० मध्ये १६ अशा एकूण ६० शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. शेततळ्यांचे अनुदान मिळाले आहे.
मत्स्य व्यवसायाची संधी
पाऊस न आल्यास शेततळ्यात साचलेले पाणी पाईप वा नहराद्वारे पिकाला देता येणार आहे. खरीप हंगामाची फसल झाल्यावर शेततळ्यात पाणी शिल्लक राहिल्यास भाजीपाला पिके घेऊन उत्पन्नात भर पाडू शकतो. तर काही शेतकºयांना या शेततळ्यामध्ये मत्स्य व्यवसाय करण्याची संधी यामुळे निर्माण झाली आहे. त्यासाठी पाऊस पडल्यावर पाण्याचा योग्य तो निचरा होऊन शेततळ्यात पाण्याची साठवणूक कशी होईल, याचे नियोजन शेतकऱ्यांना करावे लागणार आहे.
सिंचनाची सोय नसलेल्या व निव्वळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून पिकांना शेततळ्यातील पाणी फायदेशीर आहे. शेततळ्याच्या माध्यमातून शेतकरी मत्स्यपालन व्यवसायाकडे वळले आहे.
आर. एम. वासेकर,
कृषी सहाय्यक, विसोरा
शेततळा बांधल्यामुळे त्यातील पाणी धान पीक शेतीसाठी उपयोगात आले. मत्स्य उत्पादनासाठी मत्स्यबीज सुद्धा टाकले आहे.
सुखदेव मुंडले शेतकरी, विसोरा