अखंड भारताचे श्रेय सरदार पटेलांनाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:35 AM2021-09-13T04:35:31+5:302021-09-13T04:35:31+5:30
भामरागड : स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वी भारतात असलेल्या पाचशेच्यावर संस्थानिक आणि राजे-रजवाड्यांना भारतात विलीन करुन सरदार पटेलांनी खऱ्या अर्थाने अखंड भारत ही ...
भामरागड : स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वी भारतात असलेल्या पाचशेच्यावर संस्थानिक आणि राजे-रजवाड्यांना भारतात विलीन करुन सरदार पटेलांनी खऱ्या अर्थाने अखंड भारत ही संकल्पना साकार केली, असे मत येथील राजे विश्वेश्वरराव कला, वाणिज्य महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. संतोष डाखरे यांनी व्यक्त केले.
सी. पी. ॲण्ड बेरार महाविद्यालय महाल, नागपूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित एक भारत श्रेष्ठ भारत या विषयावरील आभासी पद्धतीने एकदिवसीय राष्ट्रीय वेबिनारमध्ये मुख्य वक्ता म्हणून ते बोलत होते.
भारताला स्वातंत्र्यप्राप्ती होत असताना देशात ५६२ संस्थानिक होते. ज्यांचे एकूण क्षेत्रफळ चाळीस टक्क्यांच्या घरात होते. या सर्व संस्थानिकांना स्वतंत्र मान्यता देणे अखंड भारताच्या दृष्टीने अशक्य होते. त्यामुळेच सरदार पटेल यांनी श्रद्धा सबुरी व प्रसंगी कठोर भूमिका घेऊन त्यांचे भारतात विलीनीकरण केले. या लोहपुरुषी व्यक्तिमत्त्वामुळेच आज एक भारत श्रेष्ठ भारत ही संकल्पना साकार होऊ शकली, असेही ते पुढे म्हणाले.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी समाजसेवेसाठी सदैव तत्पर असायला पाहिजे, असे मत प्राचार्य डॉ. मिलिंद बारहाते यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. संजय पुसदकर यांनी केले.